Ram Mandir Time : अयोध्येला जाताय तर जाणून घ्या दर्शन आणि आरतीची वेळ
अयोध्येतील सर्व भाविकांना रामललाचे दर्शन घेता यावे यासाठी प्रशासन सज्ज आहे. आतापर्यंत सर्व भाविकांना व्यवस्थित दर्शन होत आहे. लोकांची वाढती गर्दी पाहता मंदिरात जास्तीत जास्त वेळ दर्शनासाठी खुले ठेवण्यात येत आहे. पण आता ट्रस्टने वेळ जाहीर केले आहे. आरतीची वेळ आणि दर्शनाची वेळ जाहीर करण्यात आली आहे.

Ram mandir schedule : राम मंदिरात रामलल्ला विराजमान झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. कार्यक्रम संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. पहिल्या दिवशी जवळपास ५ लाख लोकांनी दर्शन घेतले आहे. गेल्या ४ दिवसात मोठ्या प्रमाणात दान देखील आले आहे. लोकं मोठ्या रांगा लावून दर्शनाला येत आहेत. रामभक्त अयोध्येत येण्याचा ओघ सुरुच आहे. अशा परिस्थितीत भाविकांच्या सोयीसाठी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने अधिकृत माहिती देत आरती आणि दर्शनाची वेळ जाहीर केली आहे.
किती वाजता सुरु होते दर्शन
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या माहितीनुसार, भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता आरती आणि दर्शनाची वेळ जाहीर करत आहोत. विश्व हिंदू परिषदेचे राज्य प्रवक्ते आणि मीडिया प्रभारी शरद शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे साडेचार वाजता श्री राम लल्लाची शृंगार आरती आणि सकाळी साडेसहा वाजता मंगला आरती होईल. यानंतर 7 वाजल्यापासून भाविकांचे दर्शन सुरू होणार असून ते दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
रात्री 10 वाजता शयन आरती
दुपारी 12 वाजता रामललाची भोग आरती झाल्यानंतर त्यांना भोग अर्पण करण्यात येईल. यानंतर थोडा वेळ विश्रांती देण्यात येईल. त्यानंतर सुमारे 2 वाजल्यापासून मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी पुन्हा उघडतील. जे संध्याकाळी 7.30 पर्यंत सुरू राहणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी 7.30 रामलल्लाची आरती होईल. त्यानंतर 8 वाजता भोग आरती होईल, त्यानंतर 10 वाजता रामललाची शयन आरती होईल.
कडेकोट सुरक्षा व्यवस्था
22 जानेवारी रोजी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींना खास आमंत्रण देण्यात आले होते. अयोध्येत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. वाढती गर्दी आणि धोका लक्षात घेता एटीएस आणि रॅपिड अॅक्शन फोर्स मंदिर परिसरात तैनात करण्यात आली आहे.
अयोध्येत देशातूनच नाही तर परदेशातून ही भाविक दर्शनासाठी येत आहेत. लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने विशेष काळजी घेतली आहे. गर्दीचा ओघ सुरुच असल्याने प्रशासनावरचा ताण वाढला असला तरी व्यवस्थित दर्शन होत आहे. लोकांना आता लगेचच दर्शनसाठी न येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पीएम मोदींनी देखील मंत्र्यांना लगेच आयोध्येला न जाण्याचं आवाहन केले आहे.