Ram Mandir | ‘या’ गावात जन्माला येणाऱ्या प्रत्येक बाळाचं नाव राम, जाणून घ्या कारण
इथल्या नागरिकांच्या मनात रामाप्रती इतकी आस्था आहे की, तिथे जन्माला येणाऱ्या प्रत्येक बाळाचं नाव राम ठेवलं जातं. ही या गावातली तब्बल 250 वर्षांपूर्वींपासूनची परंपरा आहे.
बांकुडा (पश्चिम बंगाल) | 20 जानेवारी 2024 : पश्चिम बंगालच्या बांकुडा जिल्ह्यात एक अनोखं गाव आहे. या गावातील एका परिसरात रामाप्रती इतकी श्रद्धा आहे की, प्रत्येक ठिकाणी फक्त श्रीरामच दिसतात. गावातील एका परिसराचं नाव रामपाडा असं आहे. रामापाडाच्या नागरिकांच्या कुलदैवताचं नावही रामच आहे. रामपाडामध्ये रामाचं मंदिर आहे. हे मंदिर अनेक वर्षांपासून आहे. इथे गावकरी मनोभावे पूजा करतात. इथल्या नागरिकांच्या मनात रामाप्रती इतकी आस्था आहे की, तिथे जन्माला येणाऱ्या प्रत्येक बाळाचं नाव राम ठेवलं जातं. ही या गावातली तब्बल 250 वर्षांपूर्वींपासूनची परंपरा आहे.
श्रीराम हे या गावातील नागरिकांच्या आयुष्यातले अविभाज्य घटक आहेत. तिथल्या स्थानिकांचा दावा आहे की, गावातील एका बड्या प्रस्थाच्या पूर्वजाच्या स्वप्नात राम आले होते. त्यांनी स्वप्नात रामाला देवता मानलं होतं. त्यानंतर त्यांनी गावात राम मंदिरची स्थापना केली होती. तेव्हापासून रामपाड्यातील प्रत्येक जण रामाची मनोभावी पूजा करतात. रामाची आस्था करतात. त्यांचं प्रभू रामांशी एक वेगळं नातं आहे. ते प्रभू श्रीरामांसोबत एकरुप होतात. ते रामाच्या चरणी नतमस्तक होतात. आपली सुख-दु:ख रामाजवळ मांडतात. राम मंदिरात भजनात तल्लिन होतात. रामपाड्यात राम नवमीच्या दिवशी वेगळाच उत्साह असतो. इथल्या रामभक्तांमध्ये प्रचंड उत्साह संचारलेला असतो.
रामपाड्यात जन्माला आलेल्या प्रत्येक परुषाच्या नावात राम आहे. कुणाचं नाव रामकनाई ठेवण्यात आलं आहे, तर कुणाचं रामदुलाल, तर कुणाचं रामकृष्ण असे वेगवेगळी नावे इथे पुरुषणांना ठेवण्यात येतात. गेल्या अडीचशे वर्षांपासूनची ही परंपरा आहे. रामबद्दल इतकी भक्ती असलेल्या नागरिकांच्या देवतेच अयोध्येत भव्य मंदिर निर्माण होत आहे त्यामुळे रामपाड्यातील भाविकही खूप आनंदी आणि उत्साही आहेत. काही दिवसांनी रामपाड्यातील भाविकही अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराला जाणार आहेत.
अयोध्येत 22 जानेवारीला भव्यदिव्य कार्यक्रम
अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं लोकार्पण होणार आहे. मंदिर लोकार्पणाचा कार्यक्रम हा अतिशय भव्यदिव्य असणार आहे. जगभरातील अनेक दिग्गजांना या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं आहे. जवळपास 6 हजार व्हीआयपी या कार्यक्रमासाठी अयोध्येत दाखल होणार आहेत. अयोध्येत राम मंदिर बनावं ही 500 वर्षांपासूनची मागणी आहे. अखेर ही मागणी आज पूर्ण होत आहे.