नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणासाठी मोठी बातमी आहे. राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस यांना लवकरच कार्यमुक्त केलं जाणार आहे. तशा हालचाली भाजपमध्ये सुरू झाल्या आहेत. भगतसिंह कोश्यारी यांची राज्यपाल पदावरून उचलबांगडी केल्यानंतर रमेश बैस यांनाही कार्यमुक्त केलं जाणार असल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. तर दुसरीकडे राज्याला नवे राज्यपाल मिळणार आहेत. त्यामुळे राज्यात नवे राज्यपाल म्हणून कोण येणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
रमेश बैस यांना वर्षा अखेरपर्यंत कार्यमुक्त केलं जाणार आहे. त्यामुळे राज्यात नवे राज्यपाल येणार आहेत. छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. राज्यात भाजपकडे रमेश बैस यांच्या इतका प्रभावी चेहरा नाहीये. त्यामुळे रमेश बैस यांच्याकडे या निवडणुकीची धुरा देण्यावर भाजपचा भर आहे. रमेश बैस हे छत्तीसगडच्या रायपूर लोकसभा मतदारसंघातून सातवेळा निवडून आलेले आहेत. शांत आणि संयमी नेते म्हणून ते प्रसिद्ध आहेत. तसेच लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. याशिवाय पक्षाचा आणि जनतेचाही ते सर्वमान्य चेहरा आहेत. त्यामुळे त्यांना निवडणुकीच्या रणमैदानात उतरवून छत्तीसगडवर ताबा मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
छत्तीसगड जिंकण्यासाठीच रमेश बैस यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून कार्यमुक्त केलं जाणार आहे. त्यामुळे राज्यात नवे राज्यपाल म्हणून कोण येणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. लवकरच महाराष्ट्रातही निवडणुका होऊ घातल्या आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर महाराष्ट्रातील सत्ताकारणाचं भविष्य अवलंबून आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यात महत्त्वाच्या नेत्यालाच राज्यपाल म्हणून पाठवलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे भाजपच्या पुढील राजकीय खेळीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रमेश बैस यांचा जन्म 2 ऑगस्ट 1947 रोजी झाला होता. अविभाजित मध्यप्रदेशातील रायपूर येथे त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी भोपाळमधून बीएससीपर्यंत शिक्षण घेतलं होतं. शिक्षणानंतर अनेक वर्ष त्यांनी शेती केली होती. बैस यांनी पालिका निवडणुकीतून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. 1978मध्ये ते पहिल्यांदा रायपूर नगर पालिकेत सदस्य म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 1980मध्ये ते हसोद विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. मात्र 1985मध्ये ते विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यानंतर 1989मध्ये ते रायपूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते.
रमेश बैस यांनी जुलै 2021मध्ये झारखंडचे राज्यपाल म्हणून कार्यभार सांभाळला होता. त्यापूर्वी जुलै 2019 ते 2021पर्यंत ते त्रिपुराचे राज्यपाल होते. 2019मध्ये भाजप दुसऱ्यांदा केंद्रात सत्तेत आली. त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा त्रिपुराचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले होते.