‘गांधीजींची हत्या नथुराम गोडसेने केली नाही’, सावरकरांच्या पुस्तकाने मोठी खळबळ
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांच्या नव्या पुस्तकामुळे एकच खळबळ उडाली आहे. या पुस्तकात महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत मोठा दावा करण्यात आला आहे.
संदीप राजगोळकर, Tv9 मराठी, नवी दिल्ली | 29 जानेवारी 2024 : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांच्या नव्या पुस्तकामुळे एकच खळबळ उडाली आहे. रणजित सावरकर यांच्या एका पुस्तकाचं नुकतंच नवी दिल्लीत प्रकाशन झालं आहे. या पुस्तकात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत खळबळजनक दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे महात्मा गांधी यांची उद्या 30 जानेवारीला पुण्यातिथी आहे. त्याआधी रणजित सावरकर यांच्या प्रकाशित झालेल्या नव्या पुस्तकाने खळबळ उडाली आहे. त्यामागील कारणही अगदी तसंच आहे. या पुस्तकारत सावरकरांनी महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत मोठा दावा केला आहे. महात्मा गांधीजींची हत्या नथुराम गोडसेने केली नाही, असा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे रणजित सावरकर महात्मा गांधीजींच्या पोस्टमार्टमवरही आक्षेप नोंदवला आहे.
पुस्तकात नेमकं काय म्हटलं आहे?
रणजित सावरकर लिखित असलेलं ‘मेक शुअर गांधी इज डेड’ या पुस्तकाचं नवी दिल्लीत प्रकाशन झालं आहे. पण प्रकाशानंतर लगेच त्यांचं नवं पुस्तक वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. या पुस्तकात महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत वेगळा दावा करण्यात आला आहे. नथुराम गोडसे याने झाडलेल्या गोळ्या आणि महात्मा गांधीजींच्या शरीरात आढळलेल्या गोळ्या वेगवेगळ्या होत्या, असा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे. रणजित सावरकर यांचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी या पुस्तकावर प्रतिक्रिया दिली आहे. कायदेशीर बाबींचा विचार करूनच आम्ही पुस्तक प्रकाशित करतोय, असं ते म्हणाले आहेत. रणजित सावरकर यांनी महात्मा गांधीजींच्या हत्येबाबत केलेल्या दाव्यावरुन त्याचं पुस्तक आता वादाच्या भोवऱ्यात पडण्याची शक्यता आहे.
नथुराम गोडसेने 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. गांधीजींच्या हत्येनंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. महात्मा गांधी यांनी देशासाठी केलेलं काम हे इतिहासाच्या सुवर्ण अक्षरात लिहिलं गेलं आहे. पण इतक्या महान नेत्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांची हत्या केली होती. या गोडसेला गांधीजींच्या हत्येप्रकरणी 15 नोव्हेंबर 1949 रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली होती. गोडसे याच्यासह त्याचा सहकारी नारायण आप्टे यालादेखील फाशीची शिक्षा देण्यात आली होती.