इंडिया आघाडीचा धसका? सरसंघचालक मोहन भागवत यांचं ‘इंडिया’ शब्दावरील फर्मान काय?; ही कशाची चाहूल?
आपल्या मुलांना भारतीय संस्कृती, परंपरा आणि पारंपारिक मूल्यांची माहिती द्या, असं सांगतानाच सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एक दिवस आंतरराष्ट्रीय क्षमा दिवस साजरा करण्याची केंद्राकडे मागणी करण्यात येणार असल्याचं मोहन भागवत यांनी सांगितलं.
गुवाहाटी | 2 सप्टेंबर 2023 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची मोठी एकजूट निर्माण झाली आहे. विरोधकांनी आपल्याआघाडीला इंडिया आघाडी हे नाव दिलं आहे. या आघाडीत एकूण 28 राजकीय पक्ष सामील झाले आहेत. त्यामुळे भाजपनेही एनडीए मजबूत करण्यावर भर दिला आहे. भाजपने एनडीएमध्ये अगदी छोट्या पक्षांनाही घेतलं आहे. ज्यांना भाजपने गेल्या नऊ वर्ष विचारलं नाही, अशा पक्षांनाही भाजपने आपल्या आघाडीत घेतलं आहे. त्यावरून भाजपने इंडिया आघाडीचा धसका किती घेतला हे दिसून येत आहे. या घडामोडी सुरू असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्यावरून संघानेही इंडिया आघाडीचा धसका घेतला की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.
मोहन भागवत हे काल गुवाहाटी येथे होते. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी इंडिया ऐवजी भारत हा शब्द वापरण्याचं आवाहन केलं आहे. एकीकडे इंडिया आघाडीची चर्चा आणि आव्हान असतानाच संघाच्या सर्वोच्च नेत्याने इंडिया शब्दा ऐवजी भारत हा शब्द वापरण्याचा सल्ला दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. संघानेही इंडिया आघाडीचा धसका घेतला असल्याची चर्चा या निमित्ताने होऊ लागली आहे. तसेच देशाची हवा बदलतेय की काय अशी चर्चाही दबक्या आवाजात होऊ लागली आहे.
भाषा कोणतीही असो, नाव
सकल जैन समाजाच्या कार्यक्रमात मोहन भागवत बोलत होते. प्राचीन काळापासून भारत हेच नाव आपण वापरत आहोत. त्यामुळे आपण हेच नाव यापुढेही घेतलं पाहिजे. भारत हाच शब्द वापरला पाहिजे. आपल्या देशाचं नाव भारत आहे. भाषा कोणताही असो. नाव एकच असतं. ते बदलत नाही, असं भागवत म्हणाले.
दुसऱ्यांनाही समजवा
आपल्या देशाचं नाव भारत आहे. आपल्या सर्व व्यवहारातून इंडिया या शब्दाचा प्रयोग बंद केला पाहिजे. त्याऐवजी भारतच म्हटलं पाहिजे. तरच बदल घडून येईल. आपण आपल्या देशाला भारत म्हणण्याची सवय लावून घेतली पाहिजे. दुसऱ्यांनीही भारत हा शब्द वापरला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीला समजावून सांगितलं पाहिजे, असंही त्यांनी म्हटलंय.
आपण जगाला जोडलंय
सर्वांना सोबत घेऊन जाणारा भारत हा एक देश आहे. आज जगाला आपली गरज आहे. हे जग आपल्याशिवाय चालू शकत नाही. आपण योगाच्या माध्यमातून जगालाही जोडलं आहे, असं त्यांनी सांगितलं. इंग्रजांनी नवीन शिक्षण पद्धती आणली. आपल्या शिक्षण पद्धतीने मुलांच्या मनात देशभक्ती निर्माण होते, असा दावा त्यांनी केला.