चांगली बातमी | प्रवाशांना दिलासा, प्रवास भाड्यात केली मोठी कपात
Airline Tickets : केंद्र सरकारने विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा दिला आहे. विमान प्रवासाचे दर कमी करण्यात आले आहे. पुणे शहरासह विविध मार्गावरील विमान प्रवासाचे दर कमी झाले आहे. मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ही माहिती दिली.
संदीप राजगोळकर, नवी दिल्ली : देशभरातील प्रवाशांना केंद्र सरकारने चांगलाच दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने विमान भाड्यात कपात केली आहे. यामुळे पुण्यासह अनेक मार्गावरचे भाडे कमी झाले आहे. नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ही माहिती दिली. 6 जून रोजी झालेल्या एअरलाइन्सच्या सल्लागार गटाच्या बैठकीनंतर दिल्लीपासून काही मार्गांवर विमान भाड्यात 14 ते 61 टक्के कपात करण्यात आली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) आणि मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे दिल्ली ते श्रीनगर, लेह, पुणे आणि मुंबई सारख्या ठिकाणी भाडे कमी झाले आहे.
विमान प्रवासाचे दर आणि इंधनांचे दर लवकरच कमी करण्याचे संकेत केंद्र सरकारकडून देण्यात आले होते. विमान प्रवाशाचे दर गगनाला भिडल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत होती. यामुळे सर्वच विमान कंपन्यांना दर कमी करण्याचे केंद्र सरकारचे आदेश दिले.
किती कमी झाले दर
ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, 5 जून ते 6 जून रोजी दिल्ली-श्रीनगर मार्गासाठी तिकीट बुक करताना, विमान भाडे 11,913 ते 18,592 रुपये होते. पण 7 जूनला प्रवास करण्यासाठी 6 जूनला तिकीट बुक केल्यावर भाडे 10,626 ते 16,506 रुपयांवर आले आहे. पूर्वी दिल्ली-लेहचे भाडे 8658 ते 26,644 रुपये होते, जे 9707 ते 16,034 रुपयांपर्यंत खाली आले आहे. दिल्ली-पुणे, दिल्ली-अहमदाबाद मार्गाच्या भाड्यात कपात करण्यात आली आहे.
सिंधिया यांनी सांगितले की, खाजगी विमान कंपन्यांचीही स्वतःची सामाजिक जबाबदारी आहे. यामुळे विमान प्रवाशाचे भाडे वाढवण्याची मर्यादा असली पाहिजे. मंत्रालयाची भूमिका नियामकाची नसून सूत्रधाराची आहे.
इंधन दरात कपात होणार
केंद्र सरकार लवकरच देशवासीयांना दिलासा देणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किंमती कमी झाल्या आहे. त्याचा फायदा देशवासीयांना देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दरही लवकरच उतरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पुणे विमानतळावर सुविधा वाढली
पुण्यात विमान प्रवासी वाहतुकीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सध्या असलेल्या इमारतीत प्रवाशांची मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी पुणे विमानतळ प्राधिकरणाने 5 लाख चौरस फुटापेक्षा जास्त क्षेत्रफळ आणि अत्याधुनिक सोयीसुविधा असलेलं इंटिग्रेटेड टर्मिनल बांधले आहे. या टर्मिनलमुळे दरवर्षी 1 कोटींपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करु शकणार आहे.