घरातील भांडीच त्यांचा तबला होता… जाकीर हुसैन यांच्या आयुष्यातील ‘या’ गोष्टी माहीत आहे काय?
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद जाकीर हुसैन यांचे 73 व्या वर्षी निधन झाले आहे. संगीताच्या जगात त्यांचे योगदान अतुलनीय आहे. दीड दिवसाच्या वयापासूनच त्यांना संगीताचा वारसा लाभला. घरातील भांड्यांपासून ते तबला वाजवण्याची सुरुवात केली. त्यांच्या तबल्याच्या जादूने जगभरचे संगीतप्रेमी मोहित झाले.
Ustad Zakir Hussain Death : गेल्या सहा दशके भारतीयच नव्हे तर जगातील संगीतप्रेमीच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे तबला उस्ताद जाकीर हुसैन यांचं आज निधन झालं. वयाच्या 73व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रावर शोकसावट पसरलं आहे. आज संगीत मैफिल सुनी झाली आहे. त्यांना संगीत क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल 2023 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. त्यांच्या निधानाने सर्वांनाच धक्का बसला आहे. सच्चा संगीतसम्राट आपल्यातून निघून गेल्याची भावना सर्वांच्या मनात निर्माण झाली आहे.
दीड दिवसाचे असतानाच…
उस्ताद जाकीर हुसैन यांना घरातूनच संगीताचा वारसा मिळाला. त्याचे वडील देशातील प्रसिद्ध तबलावादकांपैकी एक होते. त्यांचे देश विदेशातही मोठे कॉन्सर्ट झाले होते. जाकीर हुसैन यांचा जन्म झाल्यावर दीड दिवसातच त्यांच्या वडिलांनी लहानग्या जाकीर यांच्या कानात तबल्याचे सूर ऐकवले. जाकीर हुसैन यांची संगीताशी झालेली ही पहिली ओळख होती. हा त्यांच्या वडिलांनी त्यांनी दिलेला आशीर्वाद होता. आपला मुलगा जगातील सर्वोत्तम उस्ताद बनेल याची तेव्हा त्यांना कल्पनाही नसेल.
भांड्यातून संगीत
जाकीर हे एक्स्ट्रॉर्डिनरी लीगचे होते. तबला वाजवणारे अनेक असतील, पण जाकीर यांच्या सारखा कोणीच नाही. त्यांच्या बोटांमध्ये जादू होती. त्यांच्या तबल्यातून ते कधी चालत्या ट्रेनचा आवाज काढायचे तर कधी धावत्या घोड्याचा. त्यांची सर्वात खास गोष्ट म्हणजे ते संगीताचा प्रत्येक स्वर आपल्या परफॉर्मन्सने शेवटच्या रसिकांपर्यंत पोहोचवून त्याला मंत्रमुग्ध करायचे. पण संगीताची सुरुवात तर त्यांनी घरातील भांड्यांपासूनच केली होती.
जाकीर अँड हिज तबला धा धिन धा… या पुस्तकात त्यांच्याबाबतची माहिती आहे. जाकीर हुसैन कशापद्धतीने तबला वाजवायाचे याच त्यात उल्लेख आहे. समोर आपल्या काय आहे याचा ते कधीच विचार करत नव्हते. ऐन तारुण्यात तर ते घरातील किचनमधील भांडी उलटीसुलटी करून तबला वाजवायचे. कधी कधी तर ते तबला वाजवण्यात एवढे मग्न असायचे की तबला वाजवण्याच्या नादात ते भांडं उपडं करायचे. त्यामुळे भांड्यातील सामान खाली पडून जायचे.
वडिलांकडून धडे
उस्ताद जाकीर हुसैन यांनी अत्यंत कमी वयात तबला शिकण्यास सुरुवात केली होती. तबला शिकण्यावरच त्यांचा सुरुवातीपासून भर होता. कारण तबल्याचं संगीत ऐकूनच ते मोठे झाले होते. सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्यांच्या आजूबाजूला घरात तबलाच असायचा. अनेक उस्ताद त्यांच्या घरात यायचे. त्यांच्या वडिलांची आणि या उस्तादांची जुगलबंदी त्यांना याची देही याची डोळा पाहायला मिळायची. त्यामुळे त्यांचे कान तयार झाले आणि तबला वाजवण्यासाठी हात शिवशिवू लागले. त्यांच्या वडिलांनी त्यांना तबल्यावर हात मारणं शिकवलं. तबल्यासोबत संतुलन राखायला शिकवलं. उस्ताद जाकीर हुसैन यांनी उस्ताद खलिफा वाजिद हुसैन, कंठ महाराज, शांता प्रसाद आणि उस्ताद हबीबुद्दीन खान यांच्याकडूनही तबला आणि संगीताचे धडे त्यांनी गिरवले होते.