VIDEO: महाराष्ट्रातील जैववैविध्यतेने देशाचे डोळे दिपले, चित्ररथावरील ‘या’ दोन प्राणी आणि पक्ष्याविषयी माहिती आहे काय?
राजधानी नवी दिल्लीत राजपथावर आज भारतीय संस्कृती आणि सामर्थ्याचा अभूतपूर्व सोहळा पाहायला मिळाला आहे. अनेक राज्यांनी आपआपल्या राज्यातील सांस्कृतिक गोष्टींचं प्रदर्शन घडवलं.
नवी दिल्ली: राजधानी नवी दिल्लीत राजपथावर आज भारतीय संस्कृती आणि सामर्थ्याचा अभूतपूर्व सोहळा पाहायला मिळाला आहे. अनेक राज्यांनी आपआपल्या राज्यातील सांस्कृतिक गोष्टींचं प्रदर्शन घडवलं. अनेक चित्ररथातून त्या त्या राज्यातील विविधता देशावासियांना पाहायाला मिळाली. महाराष्ट्राच्या चित्ररथावर यंदा जैववैविध्यता दाखवण्यात आली होती. महाराष्ट्रातील चित्ररथावर अनेक प्राणी, पक्षी, फुले, फळे, झाडे आणि जंगली श्वापदे आदी या चित्ररथावर दाखवण्यात आले आहेत. जणू काही संपूर्ण सृष्टीच या चित्ररथावर अवरली की काय असा भास बघणाऱ्यांना होत होता. या चित्ररथावरील राज्य प्राणी शेकरू आणि राज्य पक्षी हरियालही सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. राज्याची जैववैविध्यता आणि त्याची माहिती देणारा महानायक अमिताभ बच्चन यांचा धीर गंभीर आवाज यामुळे या चित्ररथावर सर्वांच्या नजरा खिळून राहिल्या होत्या.
महाराष्ट्र सरकारने यंदा ‘महाराष्ट्राची जैवविविधता’ या विषयावर आधारित हा चित्ररथ तयार केला होता. या देखण्या चित्ररथाच्या अग्रभागी कास पठाराला स्थान देण्यात आलं होतं. यावर फळांचा राजा आंबा, राज्य प्राणी शेकरू, राज्य पक्षी हरियाल, राष्ट्रीय पक्षी मोर, फुलपाखरू इत्यादींच्या प्रतिकृती लावण्यात आल्या होत्या. खार, सरडा झाड, वाघ आणि महाकाय फुलपाखरू धातूपासून बनविण्यात आले होते. झाडे लावू झाडे जगवू हाच आमचा धर्म खरा, असा संदेश महाराष्ट्राने दिला. जणू काही संपूर्ण जंगल की दुनियाच या चित्ररथावर अवतरल्याचा भास होत होता.
जंगलची दुनिया
महाराष्ट्राचा चित्ररथ नागपूरच्या शासकीय महाविद्यालयातून शिक्षण घेतलेल्या तरूणांनी तयार केला आहे. चांगला चित्ररथ बनवल्यामुळे विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले आहे. या चित्ररथाची संकल्पना सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहसंचालक मीनल जोगळेकर यांची असून निर्मिती संचालक बिभीषण चावरे आहेत. त्यांच्या संकल्पनेतून ही जंगलची दुनिया चित्ररथावर साकारण्यात आली होती.
सामाजिक पक्षी
या चित्ररथावरील राज्य पक्षी हरियालने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हरियाल हा राज्य पक्षी आहे. हरियाल एक सामाजिक पक्षी आहे. दिसायला तो कबुतरासारखा आहे. वड आणि पिंपळाच्या झाडावर या पक्ष्याचं घरटं असतं. ऊंचच ऊंच झाडावर घरटं बनविण्यावर या पक्ष्याचा अधिक भर असतो. घनदाट जंगलातच हा पक्षी आढळतो. भारता शिवाय पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, ब्रह्मदेश आणि चीनमध्ये हा पक्षी आढळतो.
जमिनीवर पाय न ठेवणारा पक्षी
हा पक्षी सामाजिक आहे. त्यामुळे या पक्ष्याचे थवेच्या थवे आढळतात. या पक्ष्याचा आकार 30 सेटीमीटर ते 34 सेंटीमीटर पर्यंत असतो. 230 ग्रामपासून ते 250 ग्रामपर्यंत असते. हा पक्षी अत्यंत लाजाळू आहे. मनुष्याला पाहिल्यानंतर हा पक्षी शांत राहतो. मार्च ते जून हा या पक्ष्याचा प्रजनन कालावधी असतो. या पक्ष्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्ये म्हणजे हा पक्षी कधीच जमिनीवर पाय ठेवत नाही. हा पक्षी नेहमीच झाडांवर राहतो. वृक्षाच्या सर्वात वरच्या टोकावर हे पक्षी बसलेले आढळून येतात. हरियालची चोच प्रचंड मजबूत असते. फळ तोडण्यासाठी त्याला त्याचा उपयोग होतो. हरियालचा रंग फिक्कट पिवळा असतो. त्याची शेपूट स्लेटी रंगाची असते. हा शाकाहारी पक्षी आहे. हा पक्षी फळ, वृक्षाचे अंकूर आणि अन्न खातो. हरियाल पक्षी फळ अधिक खातात. त्यांना जांभळं, बोर आदी फळे खूप आवडतात.
‘पहाडी खार’ म्हणून विदर्भात ओळख
खारूताई दिसणारा शेकरू हा प्राणी महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. विदर्भात या प्राण्याला ‘पहाडी खार’ या नावाने ओळखले जाते. अकोला जिल्ह्यात या प्राण्याची दरवर्षी गणना केली जाते. हरिश्चंद्रगड आणि कळसूबाई या अभयारण्यात या प्राण्यांची घरटी आढळून आली आहेत. झुपकेदार शेपूट आणि मखमली तांबूस रंगाचा हा प्राणी आहे. हा प्राणी शाकाहारी आणि मांसाहारीही आहे. विशिष्ट वनस्पती खाऊन हा प्राणी आपली गुजराण करतो. कधी कधी झाडांवरील पक्ष्यांची अंडी सुद्धा हा प्राणी खातो. झाडांची पाने आणि फळे हा प्राणी अधिक खातो. जंगलांची संख्या कमी होत असल्याने शेकरूंची संख्याही कमी होत आहे.
नदीकाठी आढळणारा प्राणी
हा प्राणी झाडावर उंचावर घरटे बांधतो. काट्यापासून तो घरटे बांधतो. साधारणपणे पंधरा वर्षापर्यंत हा प्राणी जगतो. शेकरू हा प्राणी वर्षभरात अनेकवेळा प्रजनन करतो. यांचा गर्भधारणेचा कालावधी 25 ते 30 दिवसांचा असतो. एकावेळेस तीन पिल्लांना तो जन्म देतो. शेकरू हा स्वतंत्र, एकटा राहणारा प्राणी असून तो मूळ भारतीय प्राणी आहे. नदीकाठच्या जंगलात हा प्राणी सर्वाधिक आढळळतो.
संबंधित बातम्या:
VIDEO: अडीच महिन्यानंतर मुख्यमंत्री ‘प्रकटले’, राऊत म्हणतात; टीका करणारे नामर्द!
टिपू सुलतान नावावरून भाजपनंतर बजरंग दलही मैदानात, मालाडमध्ये आक्रमक आंदोलन
शानदार, रुबाबदार, दिमाखदार, प्रजासत्ताक सोहळ्यातला एक Video निवडायचा झाला तर तो हाच !