माँ तुझे सलाम… गीत गात असतानाच आला हार्ट अटॅक, मंचावरच निवृत्त सैनिकाचा मृत्यू
कधी कुणाच्या बाबतीत काय होईल याचा नेम नाही. कधी कसा आणि कोणता निरोप येईल याची काही गॅरंटी नाही. एका माजी सैनिकाच्या बाबतीतही असंच झालं. देशभक्तीपर कार्यक्रमात माँ तुझे सलाम गाणं गात असतानाच अचानक हा माजी सैनिक स्टेजवर कोसळला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. हार्ट अटॅक आल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचं सांगितलं जात आहे.
हातात तिरंगा… अंगावर लष्कराचा गणवेश आणि तन्मयतेने माँ तुझे सलाम हे गाणं गात असतानाच एका माजी सैनिकाचा मंचावर मृत्यू झाला आहे. माँ तुझे सलाम हे गाणं अत्यंत जल्लोषात गात असताना लोकांनी त्यांना टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. पण अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागलं आणि ते कोसळले. त्यांच्या हातातील तिरंगा दुसऱ्या व्यक्तीने हातात घेतला. मंचावर पडल्यानंतरही लोक टाळ्या वाजवत होते. लोकांना वाटलं ते अभिनय करत आहेत. पण या माजी सैनिकाने जगाचा निरोप घेतला होता. त्यानंतर एका व्यक्तीने त्यांना हलवले. पण काहीच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे त्यांचे श्वास चालतात की नाही ते पाहिलं. पण श्वास बंद होते.
इंदौरच्या फुटी कोठी येथील ही घटना आहे. योग क्षेत्रात काम करणाऱ्या एका संस्थेने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला माजी सैनिक बलजीत हे आपल्या टीम सोबत आले होते. त्यांना या कार्यक्रमात सादरीकरण करायचं होतं. अशा प्रकारच्या कार्यक्रमात बलजीत नेहमी जातात. तिथे देशभक्तीपर कार्यक्रम करत असतात. बलजीत हे इंदौरच्या तेजाजी नगर येथील रहिवासी आहेत.
टाळ्या वाजत होत्या अन्…
लोकांनी या कार्यक्रमाला मोठी गर्दी केली होती. अनेकांनी या ठिकाणी देशभक्तीपर गीते सादर केली. मेरी आन तिरंगा है, वंदे मातरम.. आदी गाण्यांवर अनेकांनी परफॉर्मन्स दिला. बलजीत यांनी या कार्यक्रमात भाग घेतला. लष्कराच्या गणवेशातच ते स्टेजवर जोशात अवतरले होते. यावेळी त्यांनी माँ तुझे सलाम हे गीत गाण्यास सुरुवात केली. त्यांच्या गाण्याला प्रचंड प्रतिसाद मिळत होता. हातात तिरंगा घेऊन ते अत्यंत तन्मयतेने गात होते. इतक्यात अचानक त्यांना हार्ट अटॅकचा झटका आला. छातीत कळ उठली. त्यांनी लगेच तिरंगा दुसऱ्याच्या हातात दिला आणि जमिनीवर अंग टाकलं. ते कोसळत असताना लोकांना वाटलं बलजीत अभिनय करत आहेत. लोक उठून उभे राहिले. त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. पण इकडे तोपर्यंत बलजीत यांनी जगाचा निरोप घेतला होता.
सायलंट अटॅक आला
स्टेजच्या खाली बलजीत यांचा एक सहकारी होता. त्याच्या हातात तिरंगा होता. मंचावर पडलेल्या बलजीत यांची काहीच हालचाल न जाणवल्याने त्याला संशय आला. त्याने लगेच स्टेजवर जाऊन चेक केलं. बलजीत बेशुद्ध पडले होते. त्यानंतर त्यांना लगेच रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करण्याची तयारी केली. पण तोपर्यंत बलजीत यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं. सायलंट अटॅक आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.