इंडिया आघाडीत महाफूट पडणार? तीन बड्या पक्षात जुंपली; दिल्लीत आज मोठ्या घडामोडी
चार राज्यातील पराभवानंतर इंडिया आघाडीची काल महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. इंडिया आघाडीच्या कालच्या बैठकीला सर्व पक्षाचे बडे नेते उपस्थित होते. पण ही बैठक होऊन 24 तास उलटत नाही तोच आघाडीतील वाद उफाळून आला आहे. आघाडीतील तीन बड्या पक्षांमध्ये चांगलीच जुंपली आहे. त्यामुळे आघाडीत फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संदीप राजगोळकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, जालना | 20 डिसेंबर 2023 : चार राज्यातील पराभवानंतर इंडिया आघाडीची काल दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. तसेच जागा वाटपावरही चर्चा झाली. ही बैठक यशस्वी झाल्याचा दावा इंडिआ आघाडीचे नेते करत आहेत. मात्र, बैठकीला 24 तास उलटले नाही तोच इंडिया आघाडीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. इंडिया आघाडीत काहीच अलबेल नसल्याचं उघड झालं आहे. आघाडीतील तीन बड्या पक्षांमध्ये जुंपली असून त्यामुळे इंडिया आघाडीत महाफूट पडणार असल्याचं चित्र आहे.
तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये पंजाब तसेच पश्चिम बंगालमधील जागा वाटपावरून जुंपली आहे. तसेच त्यात डाव्या पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी आगीत तेल ओतल्याने हे भांडण अधिकच जुंपलं आहे. एकमेकांशी चर्चा करून उठल्यानंतर अवघ्या 24 तासात इंडिया आघाडीत जुंपली आहे. या जागा वाटपाच्या मुद्द्यावरून तिन्ही पक्ष मागे हटायला तयार नाहीत. त्यामुळे इंडिया आघाडीत मोठी फूट पडू शकते, असं सांगितलं जात आहे.
बंगालमध्ये टीएमसी आक्रमक
इंडिया आघाडीची बैठक झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात विशेष बैठक झाल्याची माहिती आहे. या बैठकीत पश्चिम बंगालमधील जागा वाटपावर चर्चा झाली. यावेळी ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला फक्त दोनच जागा सोडण्याची तयारी दाखवली आहे. काँग्रेसला पश्चिम बंगालमध्ये या पेक्षा अधिक जागा न देण्याचा निर्णय टीएमसीने घेतल्याने काँग्रेसची चांगलीच कोंडी झाली आहे. याशिवाय ममता बॅनर्जी यांनी मेघालय आणि सिक्कीमध्येही जागा मागितल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे.
पंजाबमधला तिढा काय?
पंजाबमध्ये लोकसभेच्या एकूण 11 जागा आहेत. या 11 जागा काँग्रेस सोडायला तयार नाही. काँग्रेसने आम आदमी पार्टीला एकही जागा सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. पंजाबमधील काँग्रेसचं युनिट ऐकायला तयार नाही. त्यामुळे आम्ही अकराही जागा स्वबळावर लढू, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आम आदमी पार्टी नाराज झाली आहे. पंजाबमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आप इंडिया आघाडीत राहील की नाही? याची काहीच शाश्वती नसल्याचं दिसत आहे.
येचुरीच्या विधानाने ठिणगी
दरम्यान, डाव्या पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी एक मोठं विधान केलं आहे. पश्चिम बंगालमध्ये आम्ही काँग्रेससोबत जाऊ. टीएमसीसोबत जाणार नाही. काँग्रेससोबत जाऊन आम्ही टीएमसीचा पराभव करू, असं येचुरी म्हणाले. त्यामुळे टीएमसी आणि माकपमध्ये चांगलीच जुंपली आहे.
तीन बड्या नेत्यांची बैठक
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, माकप नेते सीताराम येचुरी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यात आज महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युल्यावर चर्चा होणार आहे. जागा वाटप कशा करायच्या आणि कुठे करायच्या याची चर्चा या बैठकीत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.