पाटणा | 30 सप्टेंबर 2023 : संसदेच्या दोन्ही सभागृहात महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं आहे. या विधेयकावर राष्ट्रपतींची मोहोरही उमटली आहे. त्यामुळे महिलांना 33 टक्के राजकीय आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एमआयएमचा अपवाद वगळता सर्वच राजकीय पक्षांनी या महिला आरक्षणाला पाठिंबा दिला होता. मात्र, आता याच आरक्षणावरून शेरेबाजी केली जाऊ लागली आहे. ही शेरेबाजी करताना ज्येष्ठ नेत्यांचाही तोल ढासळताना दिसत आहे. लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे बडे नेते अब्दुल बारी सिद्दीकी यांनी महिला आरक्षणावरून धक्कादायक विधान केलं आहे. लिपस्टिक आणि बॉबकटवाल्या महिलाच इतर महिलांचा हक्क हिरावून घेतील, असं धक्कादायक विधान अब्दुल बारी सिद्दीकी यांनी केलं आहे.
मुझफ्फरपूर येथील बीबीगंजमध्ये सामाजिक जागरूकता कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना अब्दुल बारी सिद्दीकी यांचा तोल ढासळला. महिला आरक्षणात मागास आणि अति मागासांचाही कोटा ठरवला पाहिजे. महिला आरक्षणात मागासांनाही जागा राखीव ठेवल्या तर या आरक्षणाला काही अर्थ आहे. नाही तर महिला असल्याच्या नावाने पावडर, लिपस्टिक आणि बॉबकटवाल्या महिलाच संसदेत पोहोचतील. नोकऱ्यांमध्येही इतर महिलांचे अधिकार त्या हिरावून घेतील, असं विधान सिद्दीकी यांनी केलं आहे.
महिला आरक्षणात इतर जातींचाही समावेश केला जावा. मागासांनाही त्यात सामील करून घ्यावं. कोट्यामध्ये कोटा असला पाहिजे. तरच समानता येईल, असं सिद्दीकी यांनी सांगितलं. तसेच सोशल मीडियापासून दूर राहण्याचं आवाहनही त्यांनी केलं. टीव्ही आणि सोशल मीडियापासून दूर राहा. यापासून तुम्ही दूर राहाल तर तुमची प्रतिष्ठा वाढेल. कमीत कमी लोकसभा निवडणुकीपर्यंत तरी टीव्ही आणि सोशल मीडियापासून दूर राहण्याची शपथ घ्या. टीव्ही आणि सोशल मीडियावर निवडणुकीपर्यंत बहिष्कार घालण्याची शपथच समाजवाद्यांनी घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं.
टीव्ही आणि सोशल मीडियावर बहिष्कार टाकल्याने तुमचं अन्न पाणी थांबणार नाही. या संमेलनात हा संकल्प कराच. नाही तर संमेलनाला काहीच अर्थ उरणार नाही. आपल्या पूर्वजांचे अपमान आम्ही स्मरणात ठेवू असा संकल्प करा. आपल्या मुलांना शिक्षण देऊ, आपल्या हक्कासाठी लढू आणि आम्ही लोहियांनी दिलेल्या मार्गावरूनच जाऊ असा संकल्प करा, असं आवाहनही त्यांनी केलं.
दरम्यान, सिद्दीकी यांच्या बॉबकट आणि लिपस्टिकच्या विधानाचं आरजेडीने समर्थन केलं आहे. रुपकाच्या माध्यमातून सिद्दीकी यांनी आपलं म्हणणं मांडलं आहे. त्यात गैर काही नाही. ग्रामीण भागातील लोकांना ही रुपकं कळतात, असं आरजेडीचे प्रवक्ते मृत्यूंजय तिवारी यांनी म्हटलं आहे. जेडीयूचे राष्ट्रीय सचिव राजीव रंजन यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोणत्याही अटीशिवाय आम्ही महिला विधेयकाच्या बाजूने आम्ही मतदान केलं आहे. पण बिहारचं महिला आरक्षणाचं मॉड्यूल सर्वात चांगलं आहे. केंद्र सरकारने हे मॉड्यूल पाहावं आणि त्यानुसार विधेयकात दुरुस्ती करायला हवी, असं राजीव रंजन म्हणाले.