जबलपूर – एका आरटीओ अधिकाऱ्याकडे (RTO officer)आर्थिक अपराध गुन्हे शाखेने (EOW)टाकलेल्या छाप्यात प्रचंड संपत्ती हाती लागली आहे. या अधिकाऱ्याकडे त्याच्या उत्पन्नापेक्षा 650 पट अधिक संपत्ती असल्याचे समोर आल्याने तपास अधिकारीही चक्रावले आहेत. क्षेत्रीय परिवहन अधिकारी (RTO officer)संतोष पाल आणि त्यांची पत्नी रेखा पाल यांच्या घरी मध्यरात्री हा छापा मारण्यात आला. या छाप्य़ात पाल यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असल्याचे समोर आले आहे. मध्यप्रदेशातील जबलपूर येथे ही कारवाई करण्यात आली आहे.
जबलपूरच्या वेगवेगळ्या कॉलनांमध्ये या पाल महाशयांची सहा अलिशान घरे असल्याचे समोर आले आहे. इतकेच नाही तर चरगवां जवळ दीड एकर परिसरात असलेले लक्झरी फार्महाऊसही समोर आले आहे. त्यांच्या घरातून 16 लाखांची कॅश आणि दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. दोन कार आणि दोन टू व्हिलरही जप्त करण्यात आल्या आहेत. या मालमत्तेतील एक बंगला हा 10 हजार स्क्वेअर फूटचा आहे. आर्थिक अपराध गुन्गे शाखेच्या 30 सदस्यांनी हा छापा टाकला होता. विशेष म्हणजे संतोष पाल यांची पत्नी रेखा पाल या आरटीओ ऑफिसात क्लार्क असल्याची माहिती आहे.
संतोष पाल यांच्या शताब्दीपूरम परिसरातील तीन मजल्याच्या अलिशान घरात सगळे लक्झरी सामान असल्याचे समोर आले आहे. घरात लिफ्ट, वुडन केस, गार्डन, स्विमिंग पूल, झुंबरे अशा अनेक महागड्या वस्तू असल्याचे समोर आले आहे. पाल महाशयांच्या बँक लॉकर आणि बँक खात्यांची माहिती अद्याप उघड झालेली नाही.
ईओडब्ल्यूचे पोलीस अधीक्षक देवेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले की, अद्यापही पाल दाम्पत्याच्या संपत्तीचा शोध सुरु आहे. संतोष पाल आणि त्यांच्या पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या चौकशीतून त्यांची अजून संपत्ती बाहेर येण्याची शक्यता आहे.
आरटीओ अधिकारी संतोष पाल यांचे वादाचे जुने नाते आहे. बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात त्यांची चौकशी यापूर्वी करण्यात आलेली आहे. काही दिसांपूर्वी त्यांचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता.