Punjab Election 2022: अकाली दल आणि बसपाची आघाडी, 25 वर्षानंतर एकत्र; पंजाबमध्ये काँग्रेसच्या सत्तेला मोठं आव्हान!

| Updated on: Dec 24, 2021 | 3:08 PM

येत्या 2022मध्ये होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी शिरोमणी अकाली दल (shiromani akali dal) आणि बहुजन समाज पार्टीमध्ये आघाडी झाली आहे. तब्बल 25 वर्षानंतर दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत.

Punjab Election 2022: अकाली दल आणि बसपाची आघाडी, 25 वर्षानंतर एकत्र; पंजाबमध्ये काँग्रेसच्या सत्तेला मोठं आव्हान!
sukhbir singh badal
Follow us on

चंदीगड: येत्या 2022मध्ये होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी शिरोमणी अकाली दल आणि बहुजन समाज पार्टीमध्ये आघाडी झाली आहे. तब्बल 25 वर्षानंतर दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे पंजाबमधील काँग्रेसच्या सत्तेसमोर तगडं आव्हान उभं राहण्याची शक्यता राजकीय सूत्रांनी वर्तवली आहे. (SAD, BSP to fight 2022 Punjab Assembly polls in alliance)

शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी या आघाडीची घोषणा केली. पंजाबच्या राजकारणासाठी हा नवा आणि महत्त्वाचा दिवस आहे. गेल्या वर्षभरापासून अकाली दल कृषी कायद्यांविरोधात केंद्र सरकारशी लढत आहे. या मुद्द्यावर आम्ही भाजपसोबतची युतीही तोडली आहे. आता बसपासोबत युती केली असून आम्ही 20 जागांवर लढणार आहोत, असं बादल यांनी सांगितलं. बसपा आणि अकाली दल मिळून पंजाबमध्ये मोठा विजय मिळवू, असा दावाही त्यांनी केला आहे. पंजाबमध्ये दलितांची संख्या देशात सर्वाधिक आहे. पंजाबमध्ये लोकसंख्येच्या 33 टक्के दलित आहेत. त्यामुळे दलित मते आपल्याकडे खेचण्यासाठी बसपा आणि अकाली दलाने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय भाजपशी युती तोडल्यानंतर पंजाबमध्ये स्वबळावर लढणं जोखमीचं ठरणार होतं. त्यामुळेही अकाली दलाने बसपाची साथ घेतल्याचं सांगितलं जात आहे.

25 वर्षापूर्वी 11 जागा जिंकल्या

यापूर्वी 1996मध्ये म्हणजे 25 वर्षापूर्वी अकाली दल आणि बसपाची आघाडी झाली होती. त्यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत या आघाडीने 13 पैकी 11 जागा जिंकल्या होत्या. यात बसपाला तीन तर अकाली दलाला 10 पैकी 8 जागांवर विजय मिळाला होता. आता 25 वर्षानंतर या दोन्ही पक्षांचा राज्यातील जनाधार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष काँग्रेसला धक्का देऊ शकतात, असं सांगितलं जात आहे.

भाजप, आपशी युती नाहीच

सुखबीर सिंग बादल यांनी गेल्याच आठवड्यात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी भाजप आणि आम आदमी पार्टी सोडून कुणाशीही आघाडी करण्यास तयार असल्याचं जाहीर केलं होतं. हे दोन पक्ष सोडून आम्ही कोणत्याही पक्षासोबत आघाडी करू शकतो, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर बसपा-अकाली दल एकत्र येण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती.

त्या 23 पैकी 18 जागांवर बसपा लढणार

2011 च्या जनगणनेनुसार देशातील कोणत्याही राज्यांच्या तुलनेत पंजाबमध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या सर्वाधिक आहे. राज्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 88.60 लाख आहे. यातील अर्ध्याहून अधिक लोक ग्रामीण भागात राहणारे आहेत. 2011च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार अनुसूचित जातीतील 73.33 टक्के लोक ग्रामीण भागात तर 26.67 टक्के लोक शहरी भागात राहतात. राज्यातील एकूण 23 जागांवर अनुसूचित जातीतील मते निर्णायक असल्याचं मानलं जात आहे. त्यामुळे बसपा यापैकी 18 जागांवर लढण्याची शक्यता आहे. पंजाब निवडणुकीत स्वत: मायावती आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये एकूण 117 विधानसभेच्या जागा आहेत. याआधी भाजपशी युती करून अकाली दलाने 23 जागांवर निवडणूक लढवली होती. (SAD, BSP to fight 2022 Punjab Assembly polls in alliance)

 

संबंधित बातम्या:

केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाच्या हालचाली?; जेडीयू, अपना दलची कॅबिनेटमध्ये समावेशाची शक्यता

प्रशांत किशोर यांच्याकडे राष्ट्रवादीच्या कॅम्पेनची जबाबदारी नाही; पण भाजपविरोधी आघाडी निर्माण करणार: नवाब मलिक

TMC महिला खासदाराच्या गरोदरपणावर शिक्कामोर्तब, नुसरज जहांचा ‘बेबी बंप’ फोटो व्हायरल

(SAD, BSP to fight 2022 Punjab Assembly polls in alliance)