महाराष्ट्रात यमाचा रेडा फिरतोय, त्यावर… संजय राऊत यांचा कुणावर हल्ला?
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नांदेड, संभाजीनगर आणि नागपूरमधील मृत्यू प्रकरणावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवरही हल्ला चढवला. तसेच ईडी या प्रकरणाची चौकशी करणार का? असा सवालही केला.
प्रदीप कापसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नवी दिल्ली | 6 ऑक्टोबर 2023 : राज्यातील काही रुग्णालयांमध्ये मृत्यूचं तांडव झालं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या मृत्यूप्रकरणामुळे राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तसेच या प्रकरणाची जबाबदारी घेऊन आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणीही केली जात आहे. विरोधकांनी तर मुख्यमंत्र्यांनीच स्वत: आरोग्य मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी केली आहे. या प्रकरणावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही राज्यातील शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत बैठकीसाठी आले आहेत. नाव नक्षलवादाचं आहे. पण कारणं वेगळी आहेत. महाराष्ट्रात नक्षलवाद्यांच्या हल्ल्याशिवाय 100 हून अधिक लोक मरण पावली आहेत. हा अत्यंत गंभीर विषय आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मनाला हा विषय अस्वस्थ करत नसेल तर मला वाटतं त्यांचं हृदय आणि मन मेलेलं आहे. दिल्लीवाल्यांची मन की बात ऐकायला येतात पण नांदेड, नागपूर, संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यात मृत्यूचं तांडव सुरू आहे. त्याचा आक्रोश त्यांना ऐकायला जात नाही. दोन उपमुख्यमंत्र्यांनाही हा आक्रोश ऐकायला जात नाही. महाराष्ट्रात यमाचा रेडा फिरत आहे. आणि त्या रेड्यावर एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री स्वार झाले आहेत, असा हल्ला संजय राऊत यांनी चढवला आहे.
कमिशनबाजीमुळे मृत्यू
नागपूर, नांदेड, संभाजीनगरमधील लोक मरण पावले ते औषधांच्या खरेदीतील ठेकादारीमुळ मरण पावले आहेत. कमिशनबाजीमुळे मरण पावले आहेत. तिथे ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखा घुसणार आहे का? तपास करणार आहे का? मंत्र्याचा तपास करणार आहे का? तुम्ही आम्हाला काय सांगता? असा संताप राऊत यांनी व्यक्त केला.
मी कोर्टात जातोय
रश्मी शुक्ला यांना राज्याचं पोलीस महासंचालक पद दिलं जाणार असल्याची चर्चा आहे. त्यावरूनही राऊत यांनी हल्ला चढवला. ज्यांच्यावरती फोन टॅपिंगचे आरोप आहेत, त्यांना तुम्ही पोलीस महासंचालकपदी बसवता? मी त्यातला व्हिक्टिम आहे. माझा फोन टॅप झाला. नाना पटोले यांचा फोन टॅप केला. खोटं षडयंत्र करून आमचे फोन टॅप केले, अशा पोलिसांच्या हाती तपास असेल तर काय अपेक्षा करणार? मी कोर्टात जातोय, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.
का घेतले गुन्हे मागे?
आमचे फोन टॅप करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही राज्याचं पोलीस महासंचालक नेमता हे योग्य नाही. आमचं कुणाशी वैयक्तिक भांडण नाही. माझं पोलिसांना आव्हान आहे. 2024मध्ये तुम्हाला या खोट्यांचा जबाब द्यावा लागेल. आमच्यासह 10 लोकांचे फोन टॅप झाले होते. उद्धव ठाकरेंपासून अनेकांचे फोन टॅप केले. याचे पुरावे आहेत. त्या महिलेवर गुन्हे दाखल झाले. ते मागे घेतले. का घेतले गुन्हे मागे?, असा सवाल त्यांनी केला.