अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचं षडयंत्र; आम आदमी पार्टीचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
तिहार तुरुंगात 956 डायबिटीज रुग्ण आहेत. त्यापैकी 26 रुग्णांना इन्सुलिन दिलं जात आहे. अरविंद केजरीवाल यांना इन्सुलिनची गरज आहे. मात्र, असं असतानाही त्यांची शुगर लेव्हल कमी दाखवून त्यांना इन्सुलिन दिली जात नाहीये. त्यांचे अवयव निकामी व्हावेत हा त्यामागचा हेतू आहे. केंद्र सरकारचं अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचं षडयंत्र आहे, असा आरोप आपने केला आहे.
दिल्लीतील मद्य घोटाळ्याप्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगात बंद आहेत. त्यांच्या आरोग्याच्या मुद्द्यावरून सुरू असलेला वाद अजूनही थांबलेला नाही. शनिवारी नायब राज्यपालांनी तिहार तुरुंगातून मागवलेला केजरीवाल यांच्या आरोग्याचा अहवाल समोर ठेवला. केजरीवाल यांच्या आरोग्याबाबत आपने जे दावे केले होते, ते नायब राज्यपालांनी फेटाळून लावले आहेत. मात्र, आपकडून होणारे आरोप अजूनही थांबताना दिसत नाही. तिहार तुरुंगात डायबिटीज स्पेशालिस्टच उपलब्ध नसल्याचा दावा आपने केला आहे. तसेच एम्सकडून डायबिटीज स्पेशालिस्ट मागवण्याची मागणीही केली आहे. यावेळी त्यांनी केजरीवाल यांच्या हत्येचं षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप केंद्र सरकारवर केला आहे.
दिल्ली सरकारचे मंत्री आणि आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी याबाबत मीडियाशी संवाद साधला. गेल्या 1 तारखेपासून अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगात आहेत. 21 मार्च ते 31 मार्चपर्यंत ते ईडीच्या कस्टडीत होते. आज 21 एप्रिल आहे. केजरीवाल यांच्या आरोग्याबाबत दोन प्रवाद आहेत. केजरीवाल यांच्या म्हणण्यानुसार त्यांना 20 ते 22 वर्षापासून डायबिटीज आहे. गेल्या 12 वर्षापासून ते इन्सुलिन घेत आहेत. आता त्यांना इन्सुलिनची गरज आहे, असं केजरीवाल यांचं म्हणणं आहे. इन्सुलिनची गरज असताना आपल्याला इन्सुलिन दिलं जात नाही. तुम्ही मला डॉक्टर किंवा स्पेशालिस्ट देऊ शकत नाही तर मी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे माझ्या डॉक्टरचा सल्ला घेऊ इच्छितो, असं केजरीवाल यांनी म्हटलंय.
हत्येचं षडयंत्र
तर, दुसरी बाजू भाजपची म्हणजे केंद्र सरकारची आहे. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, केजरीवाल यांना इन्सुलिनची गरज नाही. तिहार तुरुंगात डॉक्टर आणि स्पेशालिस्ट आहेत. आप नेते सौरभ भारद्वाज यांनी मीडियाशी संवाद साधला, ते म्हणाले की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. आम्ही तिहार तुरुंगाच्या अधिक्षकांना पत्र लिहून एम्समधून डायबेटॉलॉजिस्ट आणण्याची मागणी केली आहे. त्यातून भाजपच्या दाव्याची पोलखोल होत आहे. गेल्या 20 दिवसांपासून केजरीवाल यांच्या प्रकृतीची साध्या डॉक्टरकडून तपासणी केली जात होती. देशातील कोट्यवधी लोकांना मधुमेह आहे. जेव्हा रुग्णांची तपासणी केली जाते तेव्हा फास्टिंग शुगर आणि जेवल्यानंतर काही तासानंतरची शुगर लेव्हल चेक केली जाते, हे मधुमेही रुग्णांना माहीत आहे, असं भारद्वाज यांनी सांगितलं.
अवयव निकामी व्हावेत
काल केजरीवाल यांचा खोटा अहवाल दिला गेला. जेवणाच्या दोन तासानंतरची शुगर लेव्हल चेक केली नव्हती. रँडम रिपोर्ट होता. डायबिटीज रुग्णांची शुगर वेगाने वाढते आणि घटते. उदाहरण ईडी कस्टडीत त्यांची शुगर लेव्हल 40 होती. पण त्यांनी रँडम कमी झालेली शुगर दाखवली. अरविंद केजरीवाल यांची शुगर लेव्हल वाढली तरी त्यांना इन्सुलिन देता येऊ नये, यासाठी हे लपवण्यात आलं आहे. मीडियात वातावरण तयार केलं जावं आणि दुसरीकडे केजरीवाल यांचे अवयव निकामी होत राहावेत हा या मागचा हेतू आहे. डायबिटीज वाढली तर शरीरातील अवयव निकामी होतात. केंद्र सरकार केजरीवाल यांच्या हत्येचा कट रचत आहे, असा आरोप त्यांनी केला.