आणखी एक ‘कॅश फॉर जॉब’ घोटाला?, त्या मॅडम कोण?; विरोधकांनी घेरलं
गोव्यातील राजकारणात सध्या घोटाळ्यांची चर्चा सुरू आहे. आता आणखी एक घोटाळा समोर आला आहे. कॅशच्या बदल्यात नोकरी देण्याचा हा घोटाळा आहे. विशेष म्हणजे एका मॅडमने हा घोटाळा उघड केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
गोवा सरकार पुन्हा एकदा आणखी एका घोटाळ्याने चर्चेत आलं आहे. गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष आणि फतोर्दाचे आमदार विजय सरदेसाई यांनी राज्यातील वाढत्या घोटाळ्यांवरून भाजपवर निशाणा साधला आहे. दक्षिण गोवा कलेक्ट्रेटमध्ये लोअर डिव्हिजन क्लर्कच्या पदांच्या भरतीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला आहे. भरती प्रक्रियेवेळी कॅश फॉर जॉबच्या नावाखाली हा घोटाळा झाला होता. ऑक्टोबर 2023मध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली होती. त्यावेळी उमेदवारांकडून नोकरी देण्याच्या बदल्यात लाच मागण्यात आली होती. ज्या नोकऱ्या योग्य लोकांना मिळायला हव्या होत्या, त्या भाजपने विकल्या आहेत, असा आरोप विजय सरदेसाई यांनीन केल्याने खळबळ उडाली आहे.
तात्काळ चौकशी करा
आमदार विजय सरदेसाई यांनी याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे. या पदांसाठी ऑक्टोबर 2023मध्ये परीक्षा झाली होती. त्यानंतर फेब्रुवारी 2024मध्ये कौशल्य परीक्षा झाली होती. पण सात महिन्याच्या प्रक्रियेनंतरही त्याचे निकाल संशयास्पदरित्या प्रलंबित ठेवले होते. यातील काही उमेदवारांनी सरदेसाई यांच्याशी संपर्क साधून धक्कादायक माहिती दिली होती. एक मॅडम या उमेदवारांशी संपर्क साधायची. नोकरी देण्यासाठी पैसे मागायची. जे पैसे देत नव्हते त्यांना फेल केलं जायचं, असं या उमेदवारांनी सरदेसाई यांना सांगितलं. यावर सरदेसाई यांनी सवाल केला आहे. भरती परीक्षेचे निकाल घोषित करण्यासाठी सात महिने का लागतात? असा सवाल त्यंनी केला होता. या भरती प्रक्रियेवेळी कोणतीही पारदर्शिकता झाली नाही. त्यामुळे या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
मोनसेरेट यांच्या घोटाळ्याची आठवण
राज्याचे पीडब्ल्यूडी मंत्री बाबूश मोनसेरेट यांच्या खात्यातही नोकरीच्या बदल्यात पैसे घेतल्याचा घोटाळा झाला होता, याची आठवणही सरदेसाई यांनी यावेळी करून दिली. आज मोनसेरेट स्वत: या आरोपांचा सामना करत आहेत. माजी दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर यांनी जाहीरपणे बाबूश मोनसेरेट यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली होती. त्यामुळे या घोटाळ्यावर सर्वांचं लक्ष केंद्रीत झालं होतं. बाबूश सारख्या लोकांमुळे भाजप सारख्या पक्षाची बदनामी झाली आहे. या आरोपांची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी अशी मी मागणी करत आहे. मुख्यमंत्र्यांनी ही कारवाई केल्यास लोक त्यांचं समर्थनच करतील, असं उत्पल म्हणाले होते. विरोधकांनीही उत्पल यांच्या मुद्द्याला हवा देत या प्रकरणाची गंभीरपणे चौकशी करण्याची मागणी केली होती.
मोनसेरेट यांच्या विरोधात दक्षिण गोवा काँग्रेसचे खासदार कॅप्टन विरियाटो फर्नांडीस यांच्याकडून हा आरोप लावल्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांच्याच मतदारसंघात एक मॅडम नोकरीच्या बदल्यात लाच घेत असल्याचं प्रकरण उजेडात आलं होतं. त्यामुळे गोव्यातील नोकरभरतीच्या पारदर्शितेवर संशय निर्माण झाला आहे. त्यामुळेच विरोधकांनी हा घोटाळा उचलून धरला आहे.