Terror Alert Punjab : मोहाली आणि चंदीगड आयएसआयच्या निशाण्यावर, पंजाबमध्ये अलर्ट जारी; शिर्डीतून एकाला अटक
Terror Alert Punjab : या अलर्टसह पंजाबच्या दहा नेत्यांवर दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचंही समोर आलं आहे. गुप्तचर विभागाने या नेत्यांच्या नावाची यादीही पाठवली आहे. या यादीत काँग्रेस नेत्यांचीही नावे आहेत.
चंदीगड: पंजाबमध्ये (Punjab) दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अलर्ट (Terror Alert) जारी करण्यात आला आहे. पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय चंदीगड आणि मोहालीत दहशतवादी हल्ला करण्याचे षडयंत्र रचत आहे. अतिरेक्यांकडून बस स्टँडला निशाणा केला जाऊ शकतो, अशी माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे या यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. सुरक्षा यंत्रणांनी ही माहिती राज्य पोलीस (police), जीआरपी, स्टेट इंटेलिजन्सला माहिती दिली आहे. तसेच या यंत्रणांना एकत्र मिळून काम करण्यास सांगितलं आहे. दरम्यान, पंजाबमध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. नाक्या नाक्यावर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अनेक ठिकाणी नाकाबंदीही करण्यात आली आहे. तसेच संशयितांची कसून चौकशी केली जात आहे.
या अलर्टसह पंजाबच्या दहा नेत्यांवर दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचंही समोर आलं आहे. गुप्तचर विभागाने या नेत्यांच्या नावाची यादीही पाठवली आहे. या यादीत काँग्रेस नेत्यांचीही नावे आहेत. दरम्यान, या हल्ल्याच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी स्वातंत्र्य दिनाच्या आधी चार लोकांना अटक केली आहे. या चारही जणांकडून महत्त्वाची माहिती यंत्रणांच्या हाती लागली आहे. या लोकांची चौकशी केली असता त्यांनी दिल्ली, मोहाली आणि मोगा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचं म्हटलं होतं. या ठिकाणी टार्गेट किलिंगचा आपला प्लान होता, असं या अतिरेक्यांनी म्हटलं आहे.
शिर्डीतून एकाला अटक
याप्रकरणी, पंजाब पोलीस आणि महाराष्ट्र एटीएसने संयुक्त ऑपरेशन करून एका संशयिताला अटक केली होती. पंजाबचे एक सब इन्स्पेक्टर दिलबाग सिंग यांच्या कारमध्ये बॉम्ब ठेवण्याचा हा तरुण प्लान करत होता. पंजाब पोलिसांच्या गाडीच्या खाली आयईडी लावण्याच्या कारणास्तव महाराष्ट्र एटीएसने शिर्डीतून एकाला अटक केली होती. शनिवारी ही अटक करण्यात आली. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. पंजाब पोलीस आणि एटीएसने नगर जिल्ह्यातील शिर्डीत धाडसत्र केलं होतं. त्यावेळी राजेंद्र नावाच्या या संशयित आरोपीला पहाटेच ताब्यात घेण्यात आलं होतं.
पंजाब पोलीस अनेक राज्यात
अटक करण्यात आलेल्या आरोपीला पंजाब पोलिसांकडे सोपवले आहे. याआधी पंजाब पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. सब इन्स्पेक्टर दिलबाग सिंग यांच्या एसयूव्हीच्या काली आयईडी लावण्याचा हे दोन आरोपी प्रयत्न करत होते. त्यामुळे या दोघांना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. पंजाब पोलिसांनी संशयितांना अटक करण्यासाठी विविध राज्यात वेगवेगळी टीम पाठवली आहे.