कोण हा शहाजी? त्याने आधी नाव बदललं पाहिजे, भोसले घराण्याचा अपमान होतोय?; संजय राऊत यांनी सुनावले
माझ्या माहितीप्रमाणे ते हाडाचे डॉक्टर आहेत. त्यांनी बरीच वर्ष प्रॅक्टिस केलेली नाही. या विषयावर न बोललेलं बरं. मी पोलिसांना माहिती दिली आहे. त्यांना अस्वस्थ व्हायचं कारण नाही. मोर्चेबिर्चे काढले जात आहेत.
नवी दिल्ली : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यांचा समतोल ढासळला आहे. त्यामुळे ते काहीही बरळत असतात. राऊत यांनी आपलं आडनाव बदलून आगलावे ठेवावं, असा खोचक सल्ला शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिला होता. शहाजी बापू पाटील यांच्या या सल्ल्यावर संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. हा कोण शहाजी? हा काय खरा शहाजी आहे का? याने शहाजी नाव बदललं पाहिजे. नाहीत तर भोसले घराण्याचा अपमान होतोय सारखा, असा हल्लाच संजय राऊत यांनी चढवला.
आज कसबापेठ आणि चिंचवडचा प्रचार संपत आहे. त्यावरही संजय राऊत यांनी भाष्य केलं. महाराष्ट्रातील संपूर्ण मंत्रिमंडळ या दोन मतदारसंघात होतं. केंद्रीय गृहमंत्रीही पुण्याला पाय लावून गेले. चिंचवड आणि कसब्यासाठी भाजप ज्या पद्धतीने जोर लावत आहे ते पाहता भाजपला ही निवडणूक किती अवघड झालीय हे स्पष्ट होतं. काल आदित्य ठाकरे यांनी कसब्यात प्रचंड रोड शो केला. सभा घेतल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते एकदिलाने आणि एकमताने खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. उद्धव ठाकरे यांनीही व्हिडीओ द्वारे भाषण केलं. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला, असं संजय राऊत म्हणाले.
शिवसेना ठाकरेंचीच
या दोन्ही पोटनिवडणुकांचे निकाल राज्यातील राजकारणाची भविष्यातील दिशा ठरवतील. आयोगाने अन्याय पद्धतीने शिवसेना हे नाव आणि चिन्ह काढून घेतलं. तरीसुद्धा आदित्य ठाकरे हे जेव्हा दोन्ही मतदारसंघात गेले. तेव्हा त्यांच्या अवतीभोवती हजारो तरुण जमत होते. इथेच निकाल लागतो शिवसेना कुणाची आहे? जे निवडणूक आयोगाला दिसलं नाही. समजून घेतलं नाही. शिवसेना ही जनतेमध्ये आहे आणि जनता ही ठाकऱ्यांच्या मागे आहे हे दोन्ही निवडणुकात स्पष्ट दिसतंय, असं त्यांनी स्पष्ट केलं.
श्रीकांत हाडाचे डॉक्टर
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार, श्रीकांत शिंदे यांच्यावरही हल्ला चढवला. माझ्या माहितीप्रमाणे ते हाडाचे डॉक्टर आहेत. त्यांनी बरीच वर्ष प्रॅक्टिस केलेली नाही. या विषयावर न बोललेलं बरं. मी पोलिसांना माहिती दिली आहे. त्यांना अस्वस्थ व्हायचं कारण नाही. मोर्चेबिर्चे काढले जात आहेत. हे कायद्याचं राज्य असल्याचं लक्षण नाही, असा हल्ला राऊत यांनी चढवला.
दहशतवाद होता कामा नये
सामन्य माणूस असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल त्याच्या तक्रारीची चौकशी झाली पाहिजे. तक्रार केली म्हणून दहशतवाद होता कामा नये. जो आज होत आहे. कायदा काय तुमच्या घरात नाचायला ठेवला का? एका गुंडाच्या समर्थनासाठी पक्ष रस्त्यावर उतरतो. एक गुंड, हिस्ट्रिशीटर ज्याला जन्मठेपेची शिक्षा आहे. त्याच्यासाठी मिंधे गट रस्त्यावर उतरतो टाळ्या वाजवत. याने महाराष्ट्राची संस्कृती बदलत आहेत, अशी टीका त्यांनी केली.