‘तेजस्वी यादव यांचा उत्साह फक्त उद्या सकाळपर्यंत, बिहारमध्ये सत्ता एनडीएचीच येणार’, भाजपचा दावा
महागठबंधनच्या नेत्यांचा उत्साह फार काळ टिकणार नाही. कारण बिहारमध्ये फक्त एनडीएचं सरकार येणार, असा दावा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्त शाहनवाज हुसैन यांनी केला आहे (Shahnawaz Hussain on Bihar Assembly election result 2020).
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये राजदचे नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाला सर्वसामान्य जनतेने जास्त पसंती दिल्याचं समोर आलं आहे. याशिवाय एनडीएपेक्षा महागठबंधनला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे राजद आणि महागठबंधनच्या नेत्यांमध्ये उत्साह संचारला आहे. मात्र, महागठबंधनच्या नेत्यांचा हा उत्साह फार काळ टिकणार नाही. कारण बिहारमध्ये फक्त एनडीएचं सरकार येणार, असा दावा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्त शाहनवाज हुसैन यांनी केला आहे (Shahnawaz Hussain on Bihar Assembly election result 2020).
“बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या ( मंगळवार, 10 नोव्हेंबर) जाहीर होणार आहे. मंगळवारी दुपारी 12 वाजेपर्यंत कुणाचं सरकार येणार? हे उघड होईल. त्यामुळे तेजस्वी यादव यांनी उद्या सकाळपर्यंत आनंद साजरा करावा. कारण बिहारमध्ये पुन्हा एनडीएचं सरकार स्थापन होईल. त्यामुळे जदयूचे नेते नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनतील”, असं हुसैन म्हणाले.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबाबत बिहारच्या नागरिकांमध्ये एक वेगळा उत्साह आहे. त्यामुळे त्यांनी मोठ्या संख्येत पुन्हा एकदा एनडीएला मतदान केलं आहे”, असं शाहनवाज हुसैन यांनी सांगितलं (Shahnawaz Hussain on Bihar Assembly election result 2020).
एक्झिट पोलचे अंदाज चुकीचे असल्याचा दावा शाहनवाज हुसैन यांनी केला. यासाठी त्यांनी बिहारच्या 2015 सालाच्या निवडणुकीचे उदाहरण दिले. “गेल्या निवडणुकीत भाजपची सत्ता येईल, असं एक्झिट पोलमध्ये सांगितलं होतं. त्यावेळी जदयू आणि भाजपची युतीदेखील नव्हती”, असं शाहनवाज हुसैन म्हणाले.
“गेल्या निवडणुकीत एक्झिट पोल चुकीचे आले होते. याशिवाय इतर काही राज्यांमध्येदेखील एक्झिट पोलचे अंदाज चुकले आहेत. एक्झिट पोलचे आकडेवारी हे महागठबंधनसाठी दोन दिवसांची खुशी आहे. 10 तारखेला जेव्हा वास्तविक आकडेवारी येईल त्यात एनडीएचे उमेदवारांची संख्या जास्त असेल”, असा दावा शाहनवाज हुसैन यांनी केला आहे.
हेही वाचा :
जेलमधून निवडणूक लढवली, ‘छोटे सरकार’ म्हणून ख्याती, जिंकण्याआधीच कार्यकर्त्यांकडून महाभोजनाचं आयोजन