नवी दिल्ली: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांची पंतप्रधानांकडे तक्रार केली. राज्य सरकारने राज्यपाल नियुक्त काही सदस्यांची नावे राज्यपालांना दिली आहेत. अडीच वर्ष झाली तरी या सदस्यांची नियुक्ती झाली नाही. याबाबत पंतप्रधानांच्या कानावर माहिती टाकली आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं. तुमच्या तक्रारीनंतर पंतप्रधानांनी काही आश्वासन दिलं का? काही प्रतिक्रिया दिली का? असा सवालही पवारांना करण्यात आला. त्यावर मोदींना मी प्रतिक्रिया विचारली नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच पंतप्रधानांकडे लक्षद्विपच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी गेलो होतो. यावेळी महाराष्ट्राशी संबंधित दोन विषयांवर पंतप्रधानांशी बोलणं झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या घरावर छापे मारण्यात आले आहेत. संजय राऊत हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. राज्यसभेचे खासदार आहेत. याची कल्पना पंतप्रधानांना दिली आहे. राऊतांच्या घरी सेंट्रल एजन्सीने कारवाई केली. हा अन्याय आहे. 8 ते 10 एकर जमीन, फ्लॅट ताब्यात घेण्यात आला आहे. हा अन्याय आहे, असं पंतप्रधानांना सांगितल्याचं पवारांनी स्पष्ट केलं. तसेच पंतप्रधानांची प्रतिक्रिया विचारली नाही. यावर ते गंभीरपणे विचार करतील आणि त्यावर काही तरी पावले उचलतील. इतर विषयावर बोललो नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. संजय राऊतांच्या विरोधात कारवाई करण्याची गरज काय होती? त्यांच्यावरील आरोप काय? ते केवळ सरकारच्या विरोधात बोलतात म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली का? असा सवालही पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला.
येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात बदल होईल का? असा सवाल पवारांना करण्यात आला. त्यावर त्यांनी भाष्य केलं. मी यावर बोलू शकत नाही. कारण हा तीन पक्षाचा निर्णय आहे. हे तीन पक्षाचे नेते त्याबाबत निर्णय घेतील. त्याविषयी मला माहीत नाही. मला फक्त एकाच पक्षाबाबत माहीत आहे. ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. राष्ट्रवादीत व्हॅकेन्सी आहे. पण सध्या तरी पक्षात कोणताही बदल करण्यात येणार नाही. रिक्त जागांबाबत पक्ष नेत्यांशी चर्चा करून योग्य ती पावले उचलू, असं त्यांनी स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या:
BMC Elections : मुंबई महापालिकेतील घराणेशाही संपवा, फडणवीसांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन