नवी दिल्ली | 5 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दिल्लीत बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे देशभरातील पदाधिकारी उपस्थित आहेत. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहे. तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे या बैठकीला मार्गदर्शन करणार असल्याने ते बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे उद्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांबाबत निवडणूक आयोगाकडे सुनावणी होणार आहे. त्यापूर्वीच आज ही बैठक होत असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीला दिल्लीत सुरुवात झाली आहे. या बैठकीला सगळे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. या बैठकीत स्वत: शरद पवार आढावा घेणार आहेत. राज्यातील राजकीय वातावरण, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची तयारी आदी मुद्द्यांवर शरद पवार या बैठकीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच इंडिया आघाडीला बळ देण्यासाठी कार्यकर्त्यांनी काय केलं पाहिजे, याबाबतचं मार्गदर्शनही या बैठकीत केलं जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
उद्या राष्ट्रवादीबाबत निवडणूक आयोगाकडे सुनावणी होणार आहे. या सुनावणीला हजर राहण्यासाठी शरद पवार यांना समन्स बजावण्यात आलेलं आहे. मात्र, शरद पवार स्वत: या सुनावणीला उपस्थित राहणार नाहीत. त्यांच्यामार्फत त्यांचे वकील बाजू मांडणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. उद्या होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर आजच्या कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. यावेळी निवडणूक आयोगापुढे काय बाजू मांडायची? याचा मेगा प्लान ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आजच्या बैठकीत शरद पवार दोन गोष्टींवर अधिक भर देणार असल्याचं सांगितलं जात आहे. एक म्हणजे निवडणूक आयोगाने निकाल विरोधात दिला तर काय करायचं? आणि निकाल बाजूने लागला तर काय करायचं? याबाबत शरद पवार मार्गदर्शन करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
शरद पवार गटाच्या आजच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आणि उद्याची निवडणूक आयोगाकडे होणारी सुनावणी याच्या टायमिंगवरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतून शरद पवार हे शक्तीप्रदर्शन करत असून आपल्याच मागे संपूर्ण पक्ष उभा असल्याचं निवडणूक आयोगाला अप्रत्यक्षपणे दाखवून देत असल्याचंही सांगितलं जात आहे. उद्या सुनावणी होण्यापूर्वीच पक्षाची ताकद दाखवून देण्याचा त्यांचा हा प्रयत्न असल्याचं सूत्रांनी सांगितलं.