शरद पवार यांची नवी खेळी? गौतम अदानींवरून 19 विरोधी पक्ष एकिकडे अन् राष्ट्रवादीची वेगळी भूमिका, नवी मागणी काय?
भाजप विरुद्ध २० विरोधी पक्ष या राजकारणात एक अत्यंत महत्त्वाची घटना घडली. ज्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरण्यासाठी विरोधक एकवटलेत, त्या मुद्द्यावरून शरद पवार यांनी वेगळी भूमिका मांडलीय. राजकारणातल्या या 'जाणत्या राजा'च्या भूमिकेमागे नेमकं काय कारण असेल, यावरून चर्चा रंगली आहे.
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) विजयरथ कसा रोखायचा, यावरून देशातील विरोधी पक्षांची एकजूट होताना दिसतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांचे नेमके काय संबंध आहेत, हा राहुल गांधी यांनी उपस्थित केलेला मुद्दा आगामी निवडणुकांमध्ये सर्वात ज्वलंत प्रश्न असण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी संसदेच्या अधिवेशनात या मुद्द्यावरून रणकंदन माजवलं. या प्रकरणी जेपीसी अर्थात संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याची काँग्रेससह इतर विरोधी पक्षांची मागणी आहे. या प्रकरणात सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे विरोधकांमध्ये सर्वात अनुभवी राजकारणी असलेले शरद पवार यांनी या मुद्द्यावरून वेगळी भूमिका मांडली आहे. गौतम अदानींविरोधात जीपीसी नेमू नये, असं मत पवार यांनी मांडलंय.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसच्या परस्पर विरोधी भूमिका मांडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. हिंडेनबर्गच्या अहवालाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व देण्यात आलंय. या संस्थेची पार्श्वभूमी फारशी कुणाला माहिती नाही. आम्ही ते नावही ऐकलेलं नाही. त्याामुळे एका औद्योगिक समूहाला टार्गेट करण्यात आले आहे, असं मत शरद पवार यांनी मांडलं.
जेपीसी नकोच…
गौतम अदानींच्या कंपन्यांमध्ये 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक कुठून आली, यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अनेकदा पत्रकार परिषदेतून तसेच संसदेतून प्रश्न विचारले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांचे नेमके काय संबंध आहेत, हे देशाला कळलं पाहिजे. यासाठी जेपीसी स्थापन करावी, ही मागणी काँग्रेसने केली असून देशातील इतर विरोधी पक्षांनीही सहमती दर्शवली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शऱद पवार यांनी जेपीसी नको तर सुप्रीम कोर्टाची समिती नेमवी, असं म्हटलंय. जेपीसीने तिढा सुटणार नाही. त्यातून सत्यता बाहेर येणार नाही.कारण सत्ताधारी पक्षाचे बहुमत असेल तर सत्य कसे बाहेर येईल, हाही चिंतेचा विषय होता. अदानी आणि अंबानी उद्योगसमूहांना काँग्रेस नेते राहुल गांधी ज्या प्रकारे टार्गेट करत आहेत, ते मान्य नसल्याचं शरद पवार यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय.
19 विरोधी पक्ष एकिकडे अन् शरद पवार दुसरीकडे
भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना गौतम अदानींच्या मुद्द्यावरून घेरण्यासाठी देशातील सर्वच विरोधी पक्षांची मोट बांधली जात असतानाच शरद पवार यांच्या नव्या भूमिकेमुळे पेच निर्माण झालाय. 20 समविचारी विरोधी पक्षांपैकी 19 पक्षांचं मत एकिकडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस दुसरीकडे असं चित्र आहे. राष्ट्रवादीची भूमिका वेगळी असू शकते, पण अदानी उद्योग समूहावरील आरोप गंभीर असून त्यात तथ्य आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी दिली आहे. पण या मागे शरद पवार यांची नेमकी काय खेळी असेल, यावरून आता आडाखे बांधले जात आहेत. महाराष्ट्रातील तसेच राष्ट्रीय पातळीवरील समीकरणांमध्ये याचे काही वेगळे परिणाम दिसतील का, हेदेखील पडताळून पाहिलं जातंय.