नवी दिल्ली: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्यात संसद भवनात 20 मिनिटे चर्चा झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. या भेटीत नेमकी कशावर चर्चा झाली हे गुलदस्त्यात आहेत. मात्र, पाच राज्यातील निवडणूक निकाल, भाजपचं वाढतं प्राबल्य, महाराष्ट्रातील राजकारण आणि विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबतही या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी आज भाजपच्या महाराष्ट्रातील सर्व खासदारांशी संवाद साधला. त्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. मात्र, या भेटीत नक्की काय चर्चा झाली याबाबत दोन्ही नेत्यांकडून कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. मात्र, पाच राज्यांच्या निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
सध्या संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत हे शरद पवारांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात होतं. ही भेट पवारांच्या निवासस्थानी होईल, असंही सांगितलं जात होतं. मात्र, ही भेट संसदभवनात झाली. दोन्ही नेत्यांनी 20 मिनिटे एकमेकांशी चर्चा केली. या भेटीत पाच राज्यातील निवडणूक निकाल, महाराष्ट्रातील राजकारण, ईडीच्या कारवाया आणि विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं. तसेच मोदी यांनी आज महाराष्ट्रातील खासदारांशी संवाद साधला, त्याबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. आज शिवसेनेच्या खासदारांची बैठक होणार आहे, त्यामुळेही रणनीतीच्या दृष्टीने राऊत-पवार भेट महत्त्वाची मानली जात आहे.
दरम्यान, राऊत यांनी आज सकाळीच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरून भाजपला घेरलं. जी-23 आणि काँग्रेसमध्ये काही फरक नाही असं मला वाटतं. जी-23 कुणाची तरी सुपारी घेऊन काँग्रेसच्या विरोधात काम करत आहे असं मला वाटतं. काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. विरोधी पक्षाचं स्थान राहिलं पाहिजे. विरोधी पक्ष मजबूत राहिला पाहिजे. जेव्हा विरोधी पक्ष एकत्र येण्याची गोष्ट करतो तेव्हा त्यात काँग्रेस असला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे, असं राऊत म्हणाले.
भाजप शासित कोणत्या राज्याने काश्मिरी पंडितांच्या मुलासाठी काय केलं? केवळ सिनेमा टॅक्स फ्रि केल्याने त्यांच वेदना संपवता येणार नाही. 32 वर्षानंतर तुम्हाला आठवतंय? कारण पुढे चार राज्यांच्या निवडणुका आहेत. हे राजकारण आहे. आम्ही त्या पिढीला 32 वर्षापूर्वी दिलं आहे. उगाच इतिहास तोडूनमोडून लोकांसमोर आणू नका. काश्मीरची लढाई ही देशाची लढाई होती. काश्मीरमध्ये शिखांचीही हत्या झाली. राष्ट्रभक्त मुस्लिमांचीही हत्या झाली आहे. त्यावेळी फक्त बाळासाहेबांनी आवाज उठवला. बाकी सगळे अळीमिळी गुपचिळी गप्प होते. त्यांना अतिरेक्यांची भीती वाटत होती, असा दावाही त्यांनी केला.
संबंधित बातम्या:
VIDEO: राज्यपाल राजकारण करताहेत, त्यांना पदावर ठेवणं अयोग्य; संजय राऊतांचा पुन्हा हल्लाबोल
VIDEO: G-23 म्हणजे काँग्रेसचे सडके कांदे, संजय राऊत आता राहुल गांधींची भाषा बोलतायत?