तर उत्पल पर्रिकरांविरोधात उमेदवार देऊ नका, शिवसेनेची उघड भूमिका; भाजपची गोव्यात डोकेदुखी वाढणार?
भाजपचे बंडखोर नेते उत्पल पर्रिकर हे अपक्ष म्हणून निवडणूक लढत असतील तर आप, काँग्रेस, तृणमूल आणि गोवा फॉरवर्ड पार्टीने त्यांच्या विरोधात उमेदवारी देऊ नये, असं आवाहन शिवसेनेने केलं आहे. शिवसेनेने उघडपणे उत्पल पर्रिकर यांना बळ देण्याची भूमिका घेतल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे.
पणजी: गोव्यात शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत आघाडी करून भाजपला टेन्शन देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यातच भाजपचे बंडखोर नेते उत्पल पर्रिकर हे अपक्ष म्हणून निवडणूक लढत असतील तर आप, काँग्रेस, तृणमूल आणि गोवा फॉरवर्ड पार्टीने त्यांच्या विरोधात उमेदवारी देऊ नये, असं आवाहन शिवसेनेने केलं आहे. शिवसेनेने उघडपणे उत्पल पर्रिकर यांना बळ देण्याची भूमिका घेतल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे.
संजय राऊत यांनी ट्विट करून गोव्यातील सर्वच राजकीय पक्षांना हे आवाहन केलं आहे. जर उत्पल पर्रिकर पणजीतून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढत असतील तर आम आदमी पार्टी, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पार्टीने त्यांच्या विरोधात उमेदवार देऊ नये. सर्वच राजकीय पक्षांनी मतभेद विसरून त्यांच्या मागे उभे राहिलं पाहिजे. मनोहर पर्रिकर यांना तिच खरी श्रद्धांजली असेल, असं ट्विट राऊत यांनी केलं आहे.
उमेदवारी द्यावीच लागेल
त्यानंतर राऊत यांनी मीडियाशी बोलतानाही उत्पल पर्रिकर यांची बाजू घेतली आहे. मनोहर पर्रिकर हे प्रमुख नेते होते. गोव्याच्या विकासात त्यांचं योगदान होतं. पण त्यांच्या मृत्यूनंतर भाजपने त्यांच्या कुटुंबाशी वैर घेतलं आहे. आम्ही वेगळ्या पक्षाचे असलो आणि भाजप विरोधात लढत असलो तरी ते काही आमच्या मनाला पटलेलं नाही. उत्पल पर्रिकरांचा ज्या प्रकारे अपमान केला जातो हे योग्य नाही. त्यांची लायकी काय? त्यांचं कर्तृत्व काय असं भाजपकडून विचारलं जात आहे ते बरोबर नाही. पण उत्पल पर्रिकर यांना भाजपला उमेदवारी द्यावीच लागेल याची मला खात्री आहे. आमचा दबाव आहे. आम्ही सगळे त्यांच्या पाठी उभे राहिलो म्हणून भाजपला उमेदवारी द्यावीच लागणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
अटलजींचे संस्कार विसरले
यावेळी संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या टीकेचाही समाचार घेतला. वैफल्य आहे. निराशा आहे. त्यातून अशा प्रकारची भाषा वापरली जात आहे. अटलींचे संस्कार ते विसरले आहेत, असा टोलाही त्यांनी पाटील यांना लगावला.
If #UtpalParrikar contests Independent frm Panaji seat,I propose all non-BJP parties including @AamAadmiParty @INCIndia @AITCofficial @Goaforwardparty shd support his candidature & not field a candidate against him. This will be a true tribute to ManoharBhai!#Goa pic.twitter.com/q0w96MxZk9
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 17, 2022
संबंधित बातम्या:
Corona Cases India : देशात 2 लाख 58 हजार नवे रुग्ण, मृत्यूसंख्येत वाढ झाल्यानं टेन्शन वाढलं
Punjab | काँग्रेसला पंजाबमध्ये मोठा धक्का! हरजोत कमलनंतर काँग्रेसचे आणखी 5 ज्येष्ठ नेते भाजपात दाखल