‘तुमच्या डोळ्यात मला लाज दिसली नाही’, संजय राऊत यांची राज्यसभेत जोरदार फटकेबाजी
खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत आज भाजपवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी शायरीतून देखील भाजपवर निशाणा साधला. तसेच आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होईल, असंही राऊत यावेळी म्हणाले.
नवी दिल्ली | 7 ऑगस्ट 2023 : दिल्ली सेवा विधेयक आज लोकसभा पाठोपाठ राज्यसभेत मांडण्यात आलं. यावेळी विरोधकांकडून जोरदार विरोध करण्यात आला. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या भाषणात सत्ताधाऱ्यांवर जोरधार निशाणा साधला. त्यांनी शायरीतून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. त्यांनी यावेळी सरकारी संस्था हे विकल्या गेल्या आहेत, अशी टीका केली. आमदार, खासदार, सरकार आता विकले गेले आहेत, अशी टीका केली. त्यांच्या टीकेवर भाजपच्या खासदारांकडून काही प्रतिक्रिया दिली जात होती. पण त्यावर संजय राऊतांनी जास्त आवाज करु नका, असं म्हटलं.
“तुम्ही एक खूप खतरनाक बिल घेऊन आला आहात. या बिलला विरोध करण्यासाठी मी उभा आहे. जे लोक या बिलच्या समर्थनार्थ मतदान करणार ते भारत मातासोबत बेईमानी करतील. इंडियासोबत बेईमानी करतील. हा देशाच्या फेडरल स्ट्रॅक्टरवर थेट हल्ला आहे. लोकशाहीची हत्या आहे. बघा चार मिनिटे आहेत. मला दोन मिनिटे भरपूर आहेत. त्यामुळे तिकडून जास्त आवाज नका करु”, असं संजय राऊत म्हणाले.
“तुम्ही पाचवेळा निवडणूक हरलात. आजही दिल्लीच्या विधानसभेत तुमचे आमदार नाहीयत. त्यामुळे तुम्ही दिल्ली विधानसभा, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तामिळनाडू येथे कब्जा घेऊ इच्छित आहात. सरकार कोण चालवणार?”, असा सवाल संजय राऊत यांनी केला.
‘मत पुछो इस दौर में क्या क्या नहीं बिका’, राऊतांचा शायरीतून निशाणा
“आपण लोकशाहीची गोष्ट करणार तर मी तिकडचे बरेचसे माझे मित्र आहेत. मी त्यांचं भाषण ऐकत होतो. तुमच्या डोळ्यांत मला काही लाज दिसली नाही. मला गोपालदास नीरज यांच्या दोन ओळी आठवल्या. “मत पुछो इस दौर में क्या क्या नहीं बिका, आप के आँखों की शरम तक आपने बेची हैं”, अशा शब्दांत संजय राऊत यांनी निशाना साधला.
“तुम्ही सर्व विकलं आहे. पब्लिक सेक्टर पासून लोकशाही, आमदार, खासदार, सरकार सर्व विकलं आहे. तुम्ही दिल्लीची निवडणूक हरले आणि आता 2024ची निवडणूकही हरणार आहात. इंडिया जिंकणार”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.