ठाकरे गट जम्मूमध्ये विधानसभेच्या निवडणुका लढवणार; संजय राऊत यांची घोषणा
एकंदरीत तुम्ही पाहिलं असेल तर भारत जोडो यात्रेची चांगली वातावरण निर्मिती आहे. पक्ष म्हणून नाही पण देशात चांगला संदेश जात आहे. पठाणकोटला हजारो तरुण मशाली घेऊन निघाले होते.
जम्मू: ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत हे जम्मूत आले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी संजय राऊत हे जम्मूला आले आहेत. यावेळी त्यांनी शिवसेना जम्मूमध्ये विधानसभेच्या निवडणुका लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसेच देशात काँग्रेसला वगळून विरोधी पक्षांची आघाडी होऊच शकत नाही, असंही संजय राऊत यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना सुनावलं आहे.
काँग्रेसशिवाय कोणत्याही विरोधी पक्षाची आघाडी होऊ शकत नाही. एखाद्या पक्षाची भूमिका मांडण्याचा किंवा विरोध करण्याचा प्रश्न नाही. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. देशातील महत्त्वाचा पक्ष आहे. राहुल गांधी यांचं नेतृत्व तळपताना दिसत आहे. लोकं त्यांना स्वीकारत आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
एकंदरीत तुम्ही पाहिलं असेल तर भारत जोडो यात्रेची चांगली वातावरण निर्मिती आहे. पक्ष म्हणून नाही पण देशात चांगला संदेश जात आहे. पठाणकोटला हजारो तरुण मशाली घेऊन निघाले होते. मशाली काय काँग्रेसचं चिन्हं नाही. ते शिवसेनेचं चिन्हं आहे. मलाही भरून आलं. देश जागवण्यासाठी सर्वांना हातात मशालच घ्यावी लागते, असं राऊत म्हणाले.
यात्रा जरी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात असली तरी सर्वत्र काल संध्याकाळनंतर हजारो मशाली पेटलेल्या दिसल्या. पाऊस असला तरी आम्ही त्या यात्रेत सहभागी होतोय, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
शिंदे गटाच्या नेत्यांनी राऊत यांना पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला. त्याचाही त्यांनी समाचार घेतला. जम्मूवरही पाकिस्तानचे तोफगोळे पडत असतात. अतिरेक्यांचे हल्ले होत असतात. इकडे या म्हणजे कळेल. तिकडे बसून बोलणे ठिक आहे, अशी टीका त्यांनी केली.
पाकिस्तानात जाऊ ना. मोदी यांनी त्याच विषयावर मत मागितली आहेत. मोदींना पाकव्याप्त काश्मीर हिंदुस्थानात आणणं जमलं नाही अन् आमच्या हातात सत्ता आली की पाकिस्तानात जाऊ शकतो. अखंड हिंदुस्थानाचं स्वप्नही पूर्ण करू, असं ते म्हणाले.