President Election : भाजपसाठी दरवाजे बंद नाहीत, राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी चर्चेची दारे खुली; संजय राऊतांचं मोठं विधान
President Election : चर्चेची दारे कधीच शिवसेनेने बंद केली नाही. जेव्हा राष्ट्रीय विचार, मुद्दे असतात त्यावेळी शिवसेना नेहमीच सहकार्य करते. शिवसेना हा राष्ट्रीय बाण्याचा पक्ष आहे.
अयोध्या: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (President Election) विरोधकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या प्रक्रियेत विरोधकांसोबत शिवसेनाही (shivsena) सामिल झाली आहे. तर, दुसरीकडे सर्वसहमतीने एकच उमेदवार देण्यासाठी भाजपनेही (bjp) प्रयत्न सुरू केले आहेत. या सर्व घडामोडी घडत असतानाच शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. राष्ट्रीय प्रश्नावर शिवसेनेने कधीच खालच्या पातळीचं राजकारण केलं नाही. राष्ट्रीय प्रश्नावर शिवसेनेने सदैवर दरवाजे उघडे ठेवले आहेत. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठवरण्यासाठी शिवसेनेचा भाजपशी संवाद होऊ शकतो. भाजपसाठी शिवसेनेची दारे सदैव खुली आहेत, असं विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. विरोधी पक्षांसोबत राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवत असतानाच राऊत यांनी हे विधान केल्याने तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. राऊत यांच्या या विधानानंतर आता भाजप कसा प्रतिसाद देते हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.
शिवसेना नेते संजय राऊत अयोध्येत आहेत. आज त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हे मोठं विधान केलं. चर्चेची दारे कधीच शिवसेनेने बंद केली नाही. जेव्हा राष्ट्रीय विचार, मुद्दे असतात त्यावेळी शिवसेना नेहमीच सहकार्य करते. शिवसेना हा राष्ट्रीय बाण्याचा पक्ष आहे. कोणत्याही राष्ट्रीय प्रश्नावर उद्धव ठाकरे हे कधीच दरवाजे बंद करून बसले नाहीत. राष्ट्रीय भूमिकांवर त्यांनी नेहमी दरवाजे उघडे ठेवले आहेत. तुमचा प्रश्न राजकीय आहे. पण राष्ट्रीय प्रश्न असेल तर उद्धव ठाकरे कधीही खालचया पातळीचं राजकारण करत नाहीत. आमची भूमिका देशाला उत्तम नेतृत्व आणि दिशा मिळावी अशीच आहे, असं राऊत म्हणाले.
म्हणून राहुल गांधींची चौकशी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी होत आहे. हा राजकीय दबावाचा भाग असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कुणी पुढाकार घेऊ नये म्हणून अशा प्रकारची कारवाई सुरू आहे. 2024च्या निवडणुकीची ही तयारी सुरू आहे, असं त्यांनी सांगितलं.
मंत्रिपद काढून दुसरा अन्याय करू नका
नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून मागणी होत आहे. विरोधकांची ही मागणी राऊत यांनी फेटाळून लावली. हा किरकोळ प्रश्न आहे. मलिकांना अन्याय पद्धतीने या प्रकरणात गुंतवून अटक केली आहे. हा त्यांच्यावरील पहिला अन्याय आहे. आता मंत्रीपद काढून त्यांच्यावर दुसरा अन्याय करू नये. आपचे नेते सत्येंद्र जैन हे तुरुंगात आहेत आणि त्यांचं मंत्रीपद कायम आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.