VIDEO: कर्णपिशाच्चांच्या नादाला लागू नका; संजय राऊतांचा जेपी नड्डांना सल्ला
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे मुंबईत आले आहेत. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीला नेस्तनाबूत करण्याचं आवाहन केलं आहे.
नवी दिल्ली: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे मुंबईत आले आहेत. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीला नेस्तनाबूत करण्याचं आवाहन केलं आहे. नड्डा यांच्या या आवाहनावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. भाजपच्या काही कारस्थानी जेपी नड्डांच्या कानात काही सांगितलं असेल. पण नड्डा यांनी या कर्णपिशाच्चांच्या नादी लागू नये, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे.
संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही टीका केली. जेपी नड्डा सयंमी आहेत. शांत आहेत. त्यांच्या कानात भाजपच्या कपटी कारस्थानी लोकांनी काही सांगितलं असेल तर कर्णपिशाच्चांच्या नादाला त्यांनी लागू नये. नाही तर उरला सुरला भाजप सुद्धा महाराष्ट्रातून नष्ट होईल. इतकच मी त्यांना आवाहन करेल, असं राऊत म्हणाले.
भाजपला कटकारस्थानाच्या भुताने झपाटलं
भाजपला आम्ही फार जवळून पाहिलं आहे. पण आम्ही पाहिलेला भाजप आणि आजचा भाजप यात जमीन अस्मानचा फरक आहे. आजच्या महाराष्ट्र भाजपला कपट, कारस्थानाच्या कोणत्या भुताने झपाटलंय हे पाहावं लागेल. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मुलन कायदा आहे. त्यामुळे भूतं उतरविणारे जे लोकं आहेत, ते कुठे सापडत नाहीत. पण महाराष्ट्रातील जनता 2024मध्ये त्यांच्या मानगुटीवर बसलेली भूताटकी उतरविल्याशिवाय राहणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.
आम्ही ईडीला घाबरत नाही
तपास यंत्रणांकडून आघाडीच्या नेत्यांना त्रास दिला जात आहे. नीचपणाचा कळस आणि कपट काही राजकीय पक्ष करत आहेत. पण हे कारस्थान त्यांच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स हे तुमच्या घरचे नोकर आहेत अशा प्रकारे काम करत आहेत. आम्ही घाबरत नाही. ईडीचे अधिकारी आमच्याकडे येऊन गेले. परत या आम्ही स्वागताला तयार आहोत, असं राऊत म्हणाले. 2024 नंतर हे शस्त्र तुमच्यावर उलटेल. जे तलवार चालवतात ते तलवारीच्या घावानेच मरतात. तलवारीची मूठ आमच्याकडेही येईल. तेव्हा तुम्हाला तोंड लपवायला जागा राहणार नाही. कितीही कपट कारस्थान करताय ते करा. असा इशाराही त्यांनी दिला.
हे धंदे बंद करा
यावेळी त्यांनी पेट्रोलच्या दरवाढीवरूनही राऊत यांनी केंद्र सरकारवर पुन्हा हल्ला चढवला. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलचे भाव केवळ पाच, दहा रुपयांनी कमी केले. एनसीबीचे अधिकारी पाव ग्राम गांजा पकडून गाजावाजा करतात. गुजरातमध्ये साडे तीन किलो अमली पदार्थ पकडले. त्या आधी चार हजार कोटीचं ड्रग्ज पकडलं त्याचा गाजावाजा नाही. आधी शंभर दीडशे रुपये वाढवायचे आणि नंतर सव्वा रुपया दोन रुपये कमी करायचे हे धंदे बंद करा. 13 राज्यांच्या पोटनिवडणुकीत पराभव झाल्यावर 5 रुपये कमी केले. आता पेट्रोल-डिझेलचा भाव 50 रुपयांनी कमी करायचा असेल तर भाजपचा देशात पराभव करावा लागेल. त्यामुळे महागाई विरोधात देशात आंदोलन होत आहे. औरंगाबादला विराट मोर्चा होणार आहे. त्याचं नेतृत्व मी करणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या:
अनिल देशमुखांची ईडी कोठडी संपणार, जामीन मिळणार का?
मित्राचा वाढदिवस साजरा करुन घरी परतणाऱ्या 3 तरुणांचा अपघात, डंपरच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू