जालौर- आर्थिक अडचणीमुळे त्रासलेल्या एका पित्याने आपल्या 11 महिन्यांच्या मुलाला नर्मदेच्या कालव्यात (father thrown child)कल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या आरोपीने दोन वर्षांपूर्वी प्रेम विवाह (love marriage)केला होता. मात्र हाताला कोणतेही काम नसल्याने कुटुंब कसे चालवायचे, असा प्रश्न त्याच्यासमोर होता. अशा स्थितीत जन्माला आलेल्या बाळाचे करायचे काय, असा प्रश्न त्याच्यासमोर येता. या आरोपीने आपल्या बाळाचा जीव घेण्याचे ठरवले. या बाळाला त्याच्या आजी आजोबांकडे सोडून येऊ असे सांगून त्याने आपल्या पत्नीला आणि लहान बाळाला गुजरातवरुन राजस्थानात (Gujrat to Rajasthan)आणले होते. राजस्थानातील जालौर येथील सांचोर येथे हा प्रकार घडलेला आहे. सुमारे २४ तासांनंतर या बाळाचा मृतदेह सापडला आहे.
पोलिसांनी या प्रकरणात आरोपी पित्याला अटक केली आहे. आरोपी मुकेश हा 24 वर्षांचा असून, बनासकाठा येथील नलोधर गावातील रहिवासी आहे. 11 महिन्यांच्या बाळाला कालव्यात फेकून देण्याआधी गुरुवारी आरोपी मुकेश याने पत्नीसह गावातील यात्रेकरुंसाठी असलेल्या अन्नछत्रात जेवण केले होते. त्यानंतर त्याने पत्नीला सांगितले की, आपला प्रेम विवाह असल्याने घरातली सगळे नाराज आहेत. त्यामुळे मी एकटाच जातो आणि या बाळाला त्यांच्याकडे सोडून येतो. त्याने पत्नीला तिथेच थांबवले आणि तिथून 200 मीटरवर असलेल्या नर्मदेच्या कालव्यात या लहान बाळाला फेकून तो परतला. परत आल्यावर त्याने पत्नीला सांगितले की घराच्या बाहेरच बाळाला सोडून मी आलो आहे. घरातील सगळ्यांना फोन करुन नंतर हे कळवणार असल्याचेही त्याने खोटेपणाने पत्नीला सांगितले.
आरोपी मुकेशने पोलिसांना सांगितले की दोन वर्षांपूर्वी त्याने मुझफ्फरपूरच्या एका मुलीशी प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर तो आपल्या पत्नीसह अहमदाबाद येथे राहत होता. तिथे त्याला सुरक्षारक्षकाची नोकरीही मिळाली होती. सात महिन्यांपूर्वी त्याची ती नोकरी सुटली. त्यानंतर कुटुंब चालवायचे कसे असा प्रश्न त्याच्यासमोर उपस्थित झाला. कुटुंब चालवण्यासाठी त्याने भीकही मागून पाहिली, असे आरोपीने पोलिसांना सांगितले. मात्र तयातूनही कुटुंबाची गुजराण होईना. आर्थिक अडचणींसमोर हरलेल्या मुकेशने पत्नी आणि मुलासह अहमदाबादच्या एका तलावात आत्महत्या करण्याचेही त्याने ठरवले होते. मात्र त्या तलावाच्या परिसरात बरीच रहदारी असल्याने त्याला त्याचा हा प्लॅन कॅन्सल करावा लागला होता.
या अन्नछत्रात पोलीसमित्र असलेल्या काना राम याने या पती पत्नीला आले तेव्हा मुलासह पाहिले होते. नंतर काही काळाने त्यांच्याकडे मूल नव्हते. त्यामुळे काना रामला संशय आला. त्याने ही माहिती पोलिसांना कळवली. पोलिसांनी आरोपी मुकेशला ताब्यात घेवून त्याची चौकशी केल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला. बेरोजगार असल्याने मुलाला खाऊ घालण्यापुरतेही पैसे आपल्याकडे नसल्याने हे कृत्य केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. आरपीने दिलेल्या कबुलीनंतर 20 किलोमीटर अंतरावर तेतरोल येथून कालव्यातून या मुलाचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. पोस्टमार्टेनंतर या बाळावंर अंत्यसंस्कार करण्यात आले.