Shraddha Murder Case: सर्दी, ताप आणि दृश्यम 2 ची प्रतीक्षा, श्रद्धाची हत्त्या एक ‘वेल प्लॅन्ड मर्डर’?
क्राईम थ्रिलर चित्रपट दृश्यम 2 ची आफताबला प्रतीक्षा होती. आफताबने ही हत्त्या अत्यंत विचारपूर्वक केल्याचे मत तज्ञांचे आहे.
मुंबई, दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांड (Shraddha Murder Case) प्रकरणातील आरोपी आफताब पूनावालाची आज पुन्हा पॉलीग्राफ चाचणी होऊ शकते. आफताबची प्रकृती अस्वास्थ्यामुळे गुरुवारी चाचणी पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे आज पुन्हा एकदा आफताबच्या पॉलीग्राफ चाचणीची दुसरी फेरी होण्याची शक्यता आहे . फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचे पीआरओ संजीव के गुप्ता यांनी सांगितले होते की, आफताबच्या तापामुळे पॉलीग्राफ चाचणी पूर्ण होऊ शकली नाही. आफताबची तब्येत बरी झाल्यास पोलीस त्याला आज पुन्हा प्रयोगशाळेत आणू शकतात. पॉलीग्राफी चाचणीत आणखी एक बाब समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आफताबने ‘दृश्यम’ हा क्राईम थ्रिलर चित्रपटही पाहिला होता. यासोबतच तो दृश्यम चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचीही प्रतीक्षा करीत असल्याची माहिती मिळाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल आफताबला सुमारे 40 प्रश्न विचारण्यात आले होते. आफताबला पॉलीग्राफ चाचणीत 50 प्रश्न विचारले जाणार होते, मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे चौकशी अर्ध्यातच थांबवण्यात आली. यादरम्यान त्याने सुरुवातीला संपूर्ण एफएसएल टीमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे, मानसशास्त्रज्ञांना वाटते की, आफताबला श्रद्धाचा तिरस्कार होता. त्याने रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली नाही तर पूर्ण नियोजनासह केली आहे. त्याला आधी श्रद्धाला मारायचे होते, पण संधी मिळाली नाही. श्रद्धाला प्रवासाची खूप आवड होती आणि याच बहाण्याने तो श्रद्धाला उत्तराखंड आणि हिमाचललाही घेऊन गेला.
हा ‘वेल प्लॅन्ड मर्डर’
आफताबने रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली नसून नियोजनाअंतर्गत त्याने श्रद्धाला मुंबईहून दिल्लीत आणल्याचे मानसशास्त्रज्ञांच्या टीमला वाटते. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, आफताबने पोलिस चौकशीत सांगितले की, त्याचे श्रद्धाच्या आई-वडिलांसोबतही भांडण झाले होते. मानसशास्त्रज्ञांच्या टीमला वाटते की, आफताबने जरी कोर्टात सर्व काही क्षणात घडल्याचे सांगितले असले तरी त्याने ज्या पद्धतीने प्रश्नांची उत्तरे दिली त्यावरून हे स्पष्ट होते की, त्याने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्याची योजना यापूर्वीच आखली होती.
आरोपी खोटं बोलतोय की खरं, पॉलीग्राफ टेस्टवरून सगळं कळू शकतं
पॉलीग्राफ चाचणीला ‘लाय डिटेक्टर’ चाचणी असेही म्हणतात. या चाचणीमध्ये, चौकशीदरम्यान व्यक्तीची शारीरिक आणि मानसिक क्रिया मोजली जाते. या चाचणीमध्ये व्यक्तीने त्याची वैयक्तिक माहिती घेण्यापूर्वी. या दरम्यान मानसशास्त्रज्ञ त्याच्या नाडीचा वेग, हृदयाचे ठोके, रक्तदाब मोजतात. मग त्याला केसशी संबंधित प्रश्न विचारले जातात, जर ती व्यक्ती खोटे बोलत असेल तर त्याच्या हृदयाचे ठोके, त्याच्या नाडीचा दर इत्यादींमध्ये बदल होतो. ज्याद्वारे आरोपी खोटे बोलत आहे की खरे हे कळते.