दिल्लीत मर्डर, हिमाचलमध्ये षडयंत्र, पुरावे मुंबईत; श्रद्धा मर्डर मिस्ट्रीची उकल करण्यासाठी पोलिसांची शहराशहारांमध्ये भटकंती
आफताबने पोलिसांना श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे केल्याचं सांगितलं होतं. महरौलीच्या जंगलात तिच्या मृतदेहाचे तुकडे फेकल्याचंही त्याने सांगितलं होतं.
नवी दिल्ली: श्रद्धा हत्याकांड प्रकरणात पोलिसांना अजूनही आफताबच्या विरोधात हवे ते पुरावे मिळालेले नाहीत. आफताबला दोषी सिद्ध करता येईल असे पुरावे मिळालेले नाहीत. मात्र, श्रद्धा हत्याकांडातील पुरावे गोळा करण्यात पोलिसांनी कोणतीही कसूर सोडली नाही. एक दोन नव्हे तर पाच राज्यात पोलीस तपास करत आहेत. दिल्लीत तर अनेक ठिकाणी पोलिसांनी शोध घेतला. जंगलापासून ते तलावापर्यंत सर्वत्र पोलिसांनी झाडाझडती सुरू केली आहे.
पोलिसांच्या मते आफताबने दिल्लीत श्रद्धाची हत्या केली. पण तिच्या हत्येचा कट हा हिमाचलमध्येच रचला गेला असावा. मात्र, दिल्ली पोलिसांच्या हाती अजूनही पुरावे लागेले नाहीत. त्यासाटीच दिल्ली, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेशासह पाच राज्यात दिल्ली पोलीस पुरावे शोधण्यासाठी फिरत आहे.
दिल्लीत श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे ज्या ज्या ठिकाणी टाकले तिकडे पोलीस जात आहे. दुसरीकडे मुंबईत जाऊन श्रद्धाच्या मोबाईलचा शोध घेतला जात आहे. तसेच मुंबईत श्रद्धा आणि आफताबच्या जवळच्या लोकांची चौकशी केली जात आहे.
हे पुरावे हवेत
श्रद्धाच्या शरीराचे तुकडे
श्रद्धाचं डोकं
मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी वापरलेली करवत किंवा शस्त्र
श्रद्धाचे कपडे
श्रद्धाचा मोबाईल फोन
आफताबने पोलिसांना श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे केल्याचं सांगितलं होतं. महरौलीच्या जंगलात तिच्या मृतदेहाचे तुकडे फेकल्याचंही त्याने सांगितलं होतं. त्यानंतर पोलिसांनी महरौलीच्या जंगलात जाऊन कसून पाहणी केली. या ठिकाणी 13 हाडे पोलिसांनी गोळा केली असून हे हाडे प्रयोगशाळेत पाठवली आहेत.
श्रद्धाचं डोकं आणि तिच्या मृतदेहाचे काही तुकडे त्याने मैदानगढी तलावात फेकल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं होतं. पोलिसांनी त्यानंतर या तलावात श्रद्धाचं डोकं आणि मृतदेहाचे तुकडे शोधण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांच्या काहीच हाती लागलं नाही. मृतदेहाचे काही तुकडे पोलिसांना मिळाले. पण ते श्रद्धाचे नसल्याचं सांगितलं जातं.
श्रद्धाची हत्या ज्या करवतीने केली. ती करवत आणि तिचं पातं त्याने गुरुग्रामच्या डिएलएफ फेज 3 मध्ये फेकली होती. तर मोठा सुरा महरौली येथील कचऱ्याच्या डब्यात फेकला होता. पोलिसांनी या झाडींची अनेकवेळा पाहणी केली. पण तिथेही त्यांच्या हाती काही लागलं नाही.
दरम्यान, महरौली येथील आफताबच्या घरातून पोलिसांनी पाच चाकू ताब्यात घेतले आहेत. या चाकूने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले असावेत असा पोलिसांना संशय आहे. हे चाकू प्रयोगशाळेत पाठवले आहेत.
श्रद्धा आणि आफताब मुंबईत भाईंदरमध्ये राहत होते. त्यामुळे तिचा मोबाईल शोधण्यासाठी पोलीस भाईंदरमध्ये पोहोचले होते. त्यानंतर वसईतही पोलीस गेले होते. यावेळी त्यांनी श्रद्धा आणि आफताबचे मित्र, जवळचे नातेवाईक आणि शेजाऱ्यांची चौकशी केली.
पोलीस एवढ्यावरच थांबली नाही तर उत्तराखंड आणि हिमाचलमध्येही जाऊन पोलिसांनी चौकशी केली. कुल्लूतील तोष गावात जाऊन पोलिसांनी तपास केला. त्यानंतर ऋषिकेशलाही जाऊन पोलिसांनी छाननी केली.