Shri Krishna Janmabhoomi Case: श्रीकृष्ण जन्मभूमीच्या जमिनीवर शाही ईदगाह मशीद बांधली?, कोर्टाने याचिका दाखल करून घेतली
Shri Krishna Janmabhoomi Case: जिल्हा न्यायालयाने याचिका दाखल करून घेतल्यानंतर आता या वादग्रस्त स्थळाच्या सर्व्हेचा मार्ग मोकळा झाला आहे. श्रीकृष्ण जन्मभूमीची 13.37 एकरची जागा मुक्त करून शाही ईदगाह मशीद हटवण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.
वाराणासी: मथुरेच्या जिल्हा न्यायालयाने (Mathura District Court) श्रीकृष्ण जन्मभूमीप्रकरणाबाबत (Lord Krishna Janmabhoomi) वकील रंजना अग्नहोत्री (ranjana agnihotri) यांनी सादर केलेली याचिका रिव्हिजनसाठी मथुरेच्या जिल्हा न्यायालयाने दाखल करून घेतली आहे. श्रीकृष्णाचे भक्त असल्याचं सांगत वकील हरिशंकर जैन, विष्णूशंकर जैन आणि रंजना अग्निहोत्री यांनी ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्ट, श्री कृष्ण जन्मभूमी सेवा संस्थान, सुन्नी सेंट्रल बोर्ड, शाही ईदगाह आणि मशीद कमिटीला प्रतिवादी करण्यात आलं आहे. श्रीकृष्णाच्या जन्मभूमीच्या जमिनीवर शाही ईदगाह मशीद (उभारण्यात आली असून ही मशीद हटवण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. कनिष्ठ न्यायालयात याबाबतची याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, ही याचिका फेटाळून लावण्यात आली होती. त्यानंतर या वकिलांनी मथुरा जिल्हा न्यायालयात धाव घेतली. कोर्टाने ही याचिका दाखल करून घेत त्यावर 19 मे रोजी सुनावणी ठेवली होती. मात्र, आता मिळालेल्या माहितीनुसार येत्या 1 जुलै रोजी यावर सुनावणी होणार आहे.
जिल्हा न्यायालयाने याचिका दाखल करून घेतल्यानंतर आता या वादग्रस्त स्थळाच्या सर्व्हेचा मार्ग मोकळा झाला आहे. श्रीकृष्ण जन्मभूमीची 13.37 एकरची जागा मुक्त करून शाही ईदगाह मशीद हटवण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. कोर्टाने ही याचिका दाखल करून घेतली आहे. वाराणासीतील ज्ञानवापी मशिदीचा सर्व्हे करण्यात आला होता. त्यामुळे मथुरेतही अशाच प्रकारचा सर्व्हे केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, अलहाबाद उच्च न्यायालायने मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमी वाद चार महिन्यात निकाली काढण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाला दिले होते.
प्रकरण काय आहे?
रंजना अग्निहोत्री या सर्वोच्च न्यायालयातील वकील आहेत. राम जन्मभूमी प्रकरणातही त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यांनी श्रीकृष्ण जन्मस्थळाच्या 13.37 एकर जमिनीवर दावा केला आहे. ही जमीन श्रीकृष्ण जन्मस्थळाची आहे. पण त्यावर शाही ईदगाह निर्माण करण्यात आला आहे. याच जमिनीवर श्रीकृष्ण जन्मभूमी आणि मंदिराचं गर्भगृह आहे. या मुद्द्यावरून अग्निहोत्री आणि इतर वकिलांनी याचिका दाखल केली आहे.
पूजेचा अधिकार आहे
शाही ईदगाह मशिदीची जमीन श्रीकृष्ण विराजमानची संपत्ती आहे. ही संपत्ती श्रीकृष्ण विराजमानला सोपवण्यात यावी, असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. या ठिकाणी श्रीकृष्णाचे भक्त आणि आपल्याला पूजा करण्याचे अधिकार आहेत, असा दावाही त्यांनी केला आहे.