TV9 special report : गायक की राजकारणी की गँगस्टर, कोण होता सिद्धू मुसेवाला? इन्स्टावर 70 लाख का होते फॉलोअर्स?

| Updated on: May 30, 2022 | 6:13 PM

पंजाबी गायक, गुन्हेगारी आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रात वयाच्या 28 व्या वर्षी सिद्धू मुसेवालाने स्वताचे स्थान निर्माण केले होते. एका सरपंच आईच्या आणि फौजी वडिलांच्या घरात जन्मलेल्या सिद्धूने वयाच्या 28 व्या वर्षांत त्याच्या प्रसिद्धीचा डोंगर उभा केला होता. त्याचे फॉलोअर्स पंजाबातच नाही तर देशात आणि जगभरात पसरलेले होते.

TV9 special report : गायक की राजकारणी की गँगस्टर, कोण होता सिद्धू मुसेवाला? इन्स्टावर 70 लाख का होते फॉलोअर्स?
who is Siddhu moosewala
Image Credit source: social media
Follow us on

चंदीगड – पंजाबी गायक आणि काँग्रेसचा नेता सिद्धू मुसेवाला याची हत्या झाल्यानंतर तो एकदम चर्चेत आला आहे. 29 मे रोजी त्याची 2 मिनिटांत 30 गोळ्या मारुन सात हल्लेखोरांनी भरदिवसा हत्या केली. शनिवारी राज्य सरकारने दिलेल्या त्याच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आणि रविवारी त्याच्यावर भर रस्त्यात गोळीबार झाला. या घटनेनंतर पंजाबमधील राजकारण एकदम तापले आहे. पंजाबचे आपचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी या प्रकरणात होते आहे. बॉलिवूडमधून सिद्धू मुसेवालाला श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. तर त्याच्यानिमित्ताने पंजाबातील गँगस्टर्सही एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. नेमका होता तरी कोण हा सिद्धू मुसेवाला, याचा शोध.

Siddhu with Gun

सिद्धू मुसेवालाचे खरे नाव काय

सिद्धू मुसेवालाचा जन्म 17 जून 1993 रोजी मानसा जिल्ह्यातील मुसेवाला गावात झाला. त्याचे लहानपणी नाव होते शुभदीप सिंह. सिद्धू मुसेवालाला इंजिनिअर होण्याची इच्छा होती. त्यामुळे त्याने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. पण त्याच्या मनात संगीताबद्दल विशेष आवड होती. त्याच्या रॅप म्युझिकला पंजाबसह देशातील युवा पीढीने डोक्यावर घेतले होते. त्याचे मोठे फॅन फॉलोइंग होते.

कॉलेजच्या काळात संगीत शिकला, गाणी वादात

सिद्धू मुसेवाला इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असतानाच संगीत शिकला. त्यानंतर तो कॅनडाला गेला. सिद्धूची ओळख पंजाबमधील सर्वात विवादीत गायकांमध्ये होत होती. आपल्या गाण्यांतून त्याने खुलेआम बंदुका आणि गँगस्टर्स संस्कृतीला पाठिंबा दिल्याचा आरोप त्याच्यावर सातत्याने करण्यात आला. स्केपगोट आणि संजू या त्याच्या गाण्यावर प्रचंड गोँधळ झाला. एके 47 प्रकरणात त्याला जामीन मिळाल्यानंतर हे गाणे रिलिज झाले होते. या गाण्यात त्याने स्वताची तुलना संजय दत्त याच्याशी केली होती.

हे सुद्धा वाचा

गीतकार म्हणून केली होती करिअरची सुरुवात

सिद्धूने आपल्या करिअरची सुरुवार गीतकार म्हणून केली होती. त्याने लायसन्स गाण्याच्या ओवी लिहिल्या होत्या. त्याच्या सो हाय या गाण्याने त्याला प्रचंड प्रसिद्धी दिली. 2018 साली त्याचा पहिला अल्बम पीबीएक्स 1 हा बाजारात आला होता.

siddhu as a performer

सिद्धू मुसेवालाचे पाच मोठे वाद

आपल्या अनेक गाण्यांतून आणि व्हिडिओतून सिद्धू मुसेवाला कायम वादात राहिला. अत्यंत स्वच्छंदी आणि जिंदादिल व्यक्ती म्हणून सिद्धू त्याच्या नीकटवर्तीयांत प्रसिद्ध होता. पण कायम वाद हे त्याच्या जगण्याचे समीकरणच होते.

1. एके-४७ गन व्हिडिओतून वादात

4 मे 2020 रोजी सिद्धू मुसेवालाचे दोन व्हिडिओ रिलिज झाले होते. त्यातल्या एका व्हिडिओत 5 पोलीस अधिकाऱ्यांसोबत एके-47रायफल चालवणे शिकतानाचा सिद्धूचा व्हिडिओ होता. तर दुसऱ्या व्हिडिओत तो स्वताची बंदूक चालवतानाचा व्हिडिओ होता. यावरुन बराच वाद झाला, सहा पोलिसांना निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणात आर्म्स एक्टनुसार सिद्धूवर गुन्हा दाखल करण्यात आला.

2. संजू गाण्यावरुन वाद

जुलै 2020 मध्ये मुसेवालाला जमानत मिळाली आणि त्याचे संजू नावाचे गाणे रिलिज झाले. या गाण्यात त्याने स्वताची तुलना संजय दत्तशी केली होती. आपल्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याला आणि एफआयआरला बैज ऑफ ऑनर म्हटले होते.

३. पंजाबी गाण्यातून खलिस्तानचे समर्थन

याच वर्षी त्याचे आणखी एक गाणे आले पंजाब. या गाण्यातून त्याने खलिस्तान समर्थक भिद्रनवाले यांची स्तुती केली होती. यातून नवा वाद झाला होता.

४. स्केपगोट गाण्यातून पंजाबी लोकांना म्हटले गद्दार

यावर्षी एप्रिल 2022 मध्ये त्याचे स्केपगोट नावाचे गाणे रिलिज झाले. या गाण्यात विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे दुख त्याने व्यक्त केले होते. या गाण्यातून पंजाबच्या मतदारांना गद्दार म्हटले असा आरोप आपने केला होता.

५. माई भागो वक्तव्यावरुन माफी

सिद्धूने त्याच्या एका गाण्यातून शिख धर्मातील संत योद्ध्या माई भागो यांच्यावर वादग्रस्त कॉमेंट केली होती, त्यावरुन शिख समाज त्याच्यावर संतापला होता. त्यानंतर अकाल तख्तमध्ये हजर होऊन सिद्धूने या प्रकरणी माफी मागितली होती.

Siddhu pose

सिद्धूचा गु्न्हेगारीशीही होता संबंध

युथ अकाली दलाचा नेता विक्रमजीत मिदखेरा याची हत्या 2021 साली ऑगस्टमध्ये झाली. या प्रकरणात सिद्धूचे नाव समोर आले होते. सिद्धूचा मॅनेजर शुगनप्रीत सिंहला ही हत्या करण्याची जबाबदारी सिद्धूने दिल्याचा आरोप होता. शुगनसिंहने या प्रकरणात कौशल गँगच्या लोकांना सुपारी दिले होते, अशीही माहिती होती. या हत्येनंतर शुगनप्रीत फरार झाला होता. कौशल गँगचे सदस्य पकडले गेले. तेव्हापासून सिद्धू गोल्डी बरार आणि बिश्नोई गँगच्या रडारवर होता. सिद्धूच्या हत्येनंतर गोल्डी बरारने या हत्येची जबाबदारी स्वीकारणारी पोस्ट फेसबुकवर लिहिली आहे. यात विक्रमजीत सिंह मूदखेरा आमि गुरलाल बरार यांच्या हत्येत मुसेवालाचे नाव समोर आले होते, असा उल्लेख केला आहे. सिद्धू मुसेवाला हा अंकित याच्या हत्येतही सामील होता, असेही लिहिण्यात आले आहे. मुसेवालाचे नाव पंजाब पोलिसांनीही घेतले होते, मात्र राजकीय दबाव वापरुन सिद्धू स्वताला वाचवत होता असे गोल्डी बरारने लिहिले आहे. या सगळ्यातून सिद्धू मुसेवालाचे गुन्हेगारी जगताशी संबंध होते, असे प्रथमदर्शनी दिसते आहे.

Siddhu in politics

राजकारणातही सिद्धू होता सक्रीय

सिद्धू मुसेवालाने नुकतीच झालेली पंजाब विधानसभा निवडणूक लढवली होती. मानसा मतदारसंघातून सिद्धू काँग्रेसच्या तिकिटावर उभा होता. आपच्या डॉ. विजय सिंगला यांच्याविरोधात सिद्धू सिंगणात होता. मुसेवाला या निवडणुकीत पराभूत झाला, त्याला हरवणारे सिंगला हे राज्याचे आरोग्यमंत्री झाले. सिंगला यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मंत्रीपदावरुन त्यांची उचलबांगडी केली होती.

सिद्धूचे होते 7 दशलक्ष फॉलोअर्स

पंजाबी गायक, गुन्हेगारी आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रात वयाच्या 28 व्या वर्षी सिद्धू मुसेवालाने स्वताचे स्थान निर्माण केले होते. एका सरपंच आईच्या आणि फौजी वडिलांच्या घरात जन्मलेल्या सिद्धूने वयाच्या 28 व्या वर्षांत त्याच्या प्रसिद्धीचा डोंगर उभा केला होता. त्याचे फॉलोअर्स पंजाबातच नाही तर देशात आणि जगभरात पसरलेले होते. इन्स्टावर त्याचे 7 मिलियन म्हणजे 70 लाख फॉलोअर्स होते. चार दिवसांपूर्वी त्याने आपली अखेरची पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती.