मोठी दुर्घटना, कृष्णेच्या पाण्यात पाच पोरं आणि एक शिक्षक उतरले, घडलेल्या घटनेनं उत्तर प्रदेश, मध्यप्रदेशही हादरले
आंध्र प्रदेशच्या गुंटूर जिल्ह्यामधून धक्कादायक घटना समोर आली आहे. कृष्णा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या सहा जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये वेदपाठशाळेत शिकणारे पाच विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा समावेश आहे.
गुंटूर: आंध्र प्रदेशच्या गुंटूर जिल्ह्यामधून धक्कादायक घटना समोर आली आहे. कृष्णा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या सहा जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये वेदपाठशाळेत शिकणारे पाच विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा समावेश आहे. हे सर्वजण उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश राज्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शोधमोहिमेनंतर या सहाही जणांचे मृतदेह पोलिसांना सापडले आहेत. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडालीये.
पोहता येत नसल्याने घात
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, हे सर्व विद्यार्थी अच्छामपेटमधील मादीपाडू गावाच्या परिसरात असलेल्या श्रृंगाचलम वेदपाठशाळेत शिकत होते. ते आंघोळीसाठी गावापासून जवळच असलेल्या कृष्णा नदीवर गेले होते. मात्र त्यांना पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शोधमोहीम राबवली, अथक प्रयत्ननंतर त्यांच्या हाती सहा जणांचे मृतदेह लागले आहेत. मात्र या सहा जणांशिवाय आणखी कोणी नदीवर आंघोळ करण्यासाठी आले होते का? याचाही शोध पोलिसांकडून सुरू आहे.
नदीचे पात्र धोकादायक
कृष्णा नदीत बुडून सहा जणांचा मृत्यू झाला, मृतांमध्ये तीन विद्यार्थी हे उत्तर प्रदेशचे आणि दोन विद्यार्थी हे मध्य प्रदेशचे होते. त्यांना शिकवणारे शिक्षक हे नारसरावपेटा गावातील रहिवासी होते. सुब्रम्ण्यम असे या 24 वर्षीय मृत शिक्षकाचे नाव आहे, तर हर्षित शुक्ला (15), शुभम त्रिवेदी (17), अंशुमान शुक्ला (14), शिव शर्मा (14), नितेश कुमार दीक्षित (15) असे मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. संबंधित मृतांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान घटनेबाबत बोलताना स्थानिकांनी सांगितले की, हे लोक ज्याठिकाणी पोहण्यासाठी आले होते, त्याठिकाणी पाण्यात उतरण्यास प्रतिबंध केलेला आहे. या ठिकाणी पाण्याची खोली अधिक आहे, तसेच शेवाळामुळे नदीपात्र अधिक धोकादायक बनले आहे. मात्र असे असतानाही ते सर्वांची नजर चुकवत नदीपात्रात उतरले होते.
संबंधित बातम्या
जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरात दहशतवाद्यांचा पोलिसांवर हल्ला; दोन पोलीस शहीद
Tirupati Temple | नवस पूर्ण झाल्याने तिरुपती मंदिरात भक्ताने दान केले तीन कोटींचे सोन्याचे दागिने