नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी काळाचा घाला; सहा जिगरी दोस्तांचा एकाच दिवशी मृत्यू
झारखंडच्या जमशेदपूरमध्ये नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. येथे झालेल्या रस्ते अपघातात सहा मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे सहाही जण नववर्षाची पार्टी आटोपून येत होते. घरी येत असताना त्यांची कार डिव्हायडरवर आदळली. अपघात इतका भयंकर होता की अपघाताचा आवाज दूरपर्यंत ऐकायला आला होता.
रांची | 1 जानेवारी 2024 : झारखंडच्या जमशेदपूर येथे अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी अत्यंत धक्कादायक आणि काळीज चिरणारी घटना घडल्याने येथील नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे. थर्टी फर्स्टची पार्टी आटोपून घरी येणाऱ्या सहा मित्रांचा विचित्र रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. बिष्टुपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्किट हाऊस एरिया परिसरातील गोल चक्कर येथे ही दुर्देवी घटना घडली आहे.
हे सहाही मित्र पार्टी आटोपून येत होते. त्यांची कार अत्यंत वेगाने सुरू होती. कारवरील नियंत्रण सुटल्याने कार डिव्हाडरवर जाऊन आदळली. त्यानंतर ही कार झाडावर जाऊन आदळली. या दुर्घटनेत कारमधील सहाही तरुणांचा मृत्यू झाला. हा अपघात अत्यंत भीषण होता. अपघात इतका भीषण होता की, अपघाताचा आवाज दूरपर्यंत ऐकायला आल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. या आवाजाने घरात असलेले लोक हादरून गेले. आवाज ऐकताच घरातून लोक बाहेर पडले आणि आवाजाच्या दिशेने धावत सुटले होते.
कार हटवण्यासाठी क्रेन मागवली
स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ पोलिसांना पाचारण केलं. पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतले असून पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. हे सहाही तरुण पार्टी करण्यासाठी कुठे गेले होते? कुठून येणार होते आणि कुठे जाणार होते? सकाळीही त्यांनी अल्कहोल घेतलं होतं का? याचा तपास पोलीस करणार आहेत. हे सहाही तरूण एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेले असावेत. तिथून येताना हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हे सहाहीजण आरआयटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुलप्तांगा येथील रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, क्रेनच्या माध्यमातून कार रस्त्यावरून हटवण्यात आल्याचंही सूत्रांनी सांगितलं.
दोघांचे जीव वाचले
या दुर्घटनेत दोघेजण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांपैकी एकाचं नाव रविशंकर आहे. रविशंकरचे वडील सुनील झा यांनी मीडियाशी संवाद साधला. अपघातात सहा मुलांचा मृत्यू झाला आहे. माझा मुलगा जखमी झालेला आहे, असं सुनील झा यांनी सांगितलं. तसेच सर्व तरुण बाबाब आश्रमात राहत होते, असंही त्यांनी सांगितलं. ज्या कारचा अपघात झाला, त्यातून आठजण प्रवास करत होते. त्यापैकी सहाजणांचा मृत्यू झाला असून दोघांचा जीव वाचला आहे.