संसदेत धूरच धूर, खासदारांची पळापळ… अंगावर शहारा आणणारी घटना
Lok Sabha Security Breach : देशाच्या संसदेत आज दोन युवकांनी अचानक खासदार बसतात त्या ठिकाणी उडी घेतली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. सुरक्षेमध्ये मोठी चूक झाली आहे. या घटनेमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाचा व्हिडिओ समोर आला आहे.
नवी दिल्ली : संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेत आज मोठी चूक झाल्याचं समोर आले आहे. लोकसभेतील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये दोन लोक प्रेक्षक गॅलरीतून अचानक उडी मारून खासदारांमध्ये पोहोचल्याचे दिसत आहे. सागर असे या एकाा व्यक्तीचे नाव आहे. हे लोक खासदाराच्या नावाने व्हिजिटर पास घेऊन लोकसभेत पोहोचले होते.
या प्रकरणाबाबत काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम म्हणाले की, अचानक 20 वर्षांच्या दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारली, त्यांच्या हातात डबा होता. या डब्यांमधून पिवळा धूर निघत होता. त्यापैकी एक जण सभापतींच्या खुर्चीकडे धावण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी त्यांनी काही घोषणाही दिल्या. हे गंभीर प्रकरण आहे, विशेषत: 13 डिसेंबर रोजी, ज्या दिवशी 2001 मध्ये संसदेवर हल्ला झाला होता.
#WATCH लोकसभा की विजिटर गैलरी से एक अज्ञात व्यक्ति कूद गया जिसके बाद सदन में हंगामा हुआ और सदन को स्थगित कर दिया गया। pic.twitter.com/70ZCasi3nC
— ANI_HindiNews (@AHindinews) December 13, 2023
या घटनेचा तपास सुरु झाला आहे. आयबी कडून या लोकांची चौकशी सुरु असल्याची माहिती मिळत आहे. सुरक्षेचा घेरा तोडून ते इथपर्यंत कसे पोहोचले आणि त्यांना संसदेत येण्यासाठी पास कोणी दिला, याची चौकशी सुरू आहे. संसदेत उडी घेणाऱ्यांशी कोणाचा संबंध आहे, याचा शोध घेतला जात आहे.
दिल्ली पोलिसांनी परिवहन भवनासमोर एक पुरुष आणि एक महिला अशा दोन आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. हे लोक रंगीबेरंगी धूर उडवून निषेध करत होते. ही संपूर्ण घटना संसदेबाहेर घडली.
या घटनेनंतर संसदेचे कामकाज पुन्हा एकदा सुरु झाले आहे. काही खासदारांकडून यावर चिंता व्यक्त केली गेली. लोकसभा अध्यक्षांनी माहिती दिली की, या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. लवकरच याबाबत माहिती दिली जाईल.