90 तास कामाचा सल्ला, L&T चेअरमन जबरदस्त ट्रोल, अखेर कंपनीला द्यावा लागले स्पष्टीकरण
sn-subrahmanyan: L&T मधील कर्मचाऱ्यांना मिळणारा सरासरी पॅकेज 2023-24 मध्ये 9.55 लाख रुपये होते. म्हणजे चेअरमन यांचे वेतन कर्मचाऱ्यांपेक्षा 534.57 पट जास्त आहे.
इन्फोसिसचे चेअरमन नारायण मूर्ती यांनी ७० तास कामाचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांच्या त्या वक्तव्यावर नेटकऱ्यांनी संमिश्र मते मांडली होती. अनेकांनी त्यांचा फंडा नाकारत इन्फोसिसमध्ये कर्मचाऱ्यांना किती पगार आहे? ते सत्य समोर आणले होते. आता इंजिनिअरींग सेक्टरमधील दिग्गज कंपनी लार्सन अँड टूब्रो (L&T) चे चेअरमन एस.एन. सुब्रह्मण्यन यांच्यांकडून ९० तास कामाचा मुद्दा पुढे आणला गेला आहे. त्यावरुन ते जबरदस्त ट्रोल होत आहे. उद्योगजगत आणि बॉलीवूडमध्येही त्यांच्या या वक्तव्याचा विरोध केला जात आहे. शेवटी या प्रकरणात कंपनीला स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. आता सुब्रह्मण्यम यांनी मिळणारा पगारही समोर आला आहे. तो कर्मचाऱ्यांपेक्षा शेकडो पटीने जास्त आहे.
सुब्रह्मण्यन यांचे पॅकेज किती?
L&T Chairman एस.एन. सुब्रह्मण्यन यांचे पॅकेज जबरदस्त आहे. कंपनीच्या रिपोर्टनुसार आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये त्यांचे वेतन 51 कोटी रुपये होते. त्यांच्या वेतनात 43.11% टक्के वाढ झाली आहे. या रिपोर्टमध्ये कंपनीचे चेअरमन आणि काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात किती फरक आहे? ते ही सांगण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांना मिळणारा सरासरी पॅकेज 2023-24 मध्ये 9.55 लाख रुपये होते. म्हणजे चेअरमन यांचे वेतन कर्मचाऱ्यांपेक्षा 534.57 पट जास्त आहे.
का सुरु झाला वाद?
L&T चेअरमन सुब्रह्मण्यम यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. व्हिडिओ कॉन्फेंसिंगने बोलताना एस.एन. सुब्रह्मण्यन सांगितले की, कंपनीत 90 तास काम करायला हवा. कर्मचाऱ्यांकडून रविवारी मी काम करु शकत नाही, याबद्दल मला खेद वाटतो. रविवारी कर्मचाऱ्यांनी काम केले तर मला जास्त आनंद मिळेल. आठवड्यातून 90 तास काम करण्याचा सल्ला देतानाच त्यांनी असे वक्तव्यही केले होते. ज्यामुळे ते सोशल मीडियावर ट्रोल झाले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘तुम्ही किती दिवस घरात तुमच्या बायकोकडे टक लावून पाहणार आहात. घरी कमी आणि ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवा, असेही त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले.
सुब्रह्मण्यम यांच्या वक्तव्याचा निषेध करत बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिच्या इन्स्टा स्टोरीवर लिहिले की, एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या एका वरिष्ठ व्यक्तीने मानसिक आरोग्याच्या बाबतीत असे विधान केले हे जाणून धक्कादायक वाटले. आरपीजी एंटरप्रायझेसचे अध्यक्ष अब्जाधीश हर्ष गोयंका यांनीही एक्सवर म्हटले की, सुब्रह्मण्यम यांच्या या हालचालीमुळे नाव देखील बदलले पाहिजे आणि ‘रविवार’ला ‘सन-ड्यूटी’ म्हटले पाहिजे.
असे दिले स्पष्टीकरण
90 तास काम करणे आणि पत्नीकडे पाहणे या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर सुब्रमण्यन यांच्यावर टीका होऊ लागली. यानंतर त्यांच्या या टिप्पणीवर कंपनीकडून स्पष्टीकरणही जारी करण्यात आले. त्यात म्हटले आहे की, 8 दशकांहून अधिक काळ आम्ही भारताच्या पायाभूत सुविधा, व्यवसाय आणि तांत्रिक क्षमतांना आकार देण्याचे काम करत आहोत. हे भारताचे दशक आहे. विकासाला चालना देण्यासाठी आणि विकसित राष्ट्र बनण्याचे आमचे सामायिक दृष्टीकोन साकार करण्यासाठी सामूहिक समर्पणाची गरज आहे. कंपनीने पुढे म्हटले आहे की आमच्या चेअरमनची टिप्पणी या महान महत्वाकांक्षेला प्रतिबिंबित करतात. जे असाधारण परिणामांसाठी असामान्य प्रयत्नांची आवश्यकता आहे.