दिल्लीची हवा बिघडली; सोनिया आणि राहुल गांधींचा मुक्काम आता गोव्यात
बिहारमधील पराभवानंतर काँग्रेस पक्षातही सध्या विरोधाचे वारे वाहत आहेत. | Sonia Gandhi
नवी दिल्ली: दिल्लीची हवा मानवत नसल्यामुळे आता काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आपला मुक्काम गोव्यात हलवला आहे. दिल्लीतील वायू प्रदूषण वाढल्यामुळे डॉक्टरांनी सोनिया गांधी यांना दिल्लीबाहेर जाण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार सोनिया गांधी आता एका आठवड्यासाठी गोव्यात राहायला जाणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत राहुल गांधीही असतील. काहीवेळापूर्वीच हे दोघे पणजी विमानतळावर दाखल झाले. (Doctors advise Sonia Gandhi to briefly move away from Delhi)
बिहारमधील पराभवानंतर काँग्रेस पक्षातही सध्या विरोधाचे वारे वाहत आहेत. बिहार विधानसभा आणि विविध राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, यानंतरही पक्षनेतृत्त्वाकडून अपेक्षित हालचाली होत नसल्याचे सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी नाराजी व्यक्त केली होती.
यानंतर गांधी घराण्याशी निष्ठावान असणाऱ्या नेत्यांनी सिब्बल यांना प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे सध्या काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी दिल्लीबाहेर जात आहेत. त्यामुळे आता यावर काय पडसाद उमटणार, हे पाहावे लागेल.
यापूर्वी जुलै महिन्यात सोनिया गांधी यांना प्रकृती बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले होते. तेव्हापासून सोनिया गांधी यांना छातीमधील संसर्गाची समस्या जाणवत आहे. यासाठी सोनिया गांधी सध्या औषधांचा हेवी डोस घेत आहेत. सप्टेंबर महिन्यात त्या वैद्यकीय तपासणीसाठी परदेशातही जाऊन आल्या होत्या. तेव्हादेखील राहुल गांधीही त्यांच्यासोबत होते.
मात्र, यामुळे राहुल गांधी यांना संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उपस्थित राहता आले नव्हते. याच काळात भाजपने संसदेत कृषी विधेयके मंजूर करवून घेतली होती. या विधेयकांना काँग्रेसकडून जोरदार विरोध करण्यात आला होता. मात्र, अशा महत्त्वाच्या प्रसंगी राहुल गांधी संसदेत उपस्थित नसल्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती.
मोदी सरकारच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी काँग्रेसकडून तीन समित्यांची स्थापना आगामी काळात मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून तीन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. आर्थिक समिती,परराष्ट्र समिती आणि राष्ट्रीय सुरक्षा या तीन समित्या मोदी सरकारच्या कामावर लक्ष ठेवतील. त्यादृष्टीने काँग्रेस केंद्र सरकारला घेरण्यासाठी रणनीती तयार करेल. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली समितीमध्ये डॉ मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, मल्लिकार्जुन खरगे प्रमुख सदस्य आहेत.
(Doctors advise Sonia Gandhi to briefly move away from Delhi)