काँग्रेसच्या आणखी एका नेत्याची उत्तरप्रदेशातून एक्झिट; यूपीऐवजी तेलंगणातून लोकसभा लढणार
देशात लवकर लोकसभा निवडणूका जाहीर होणार आहेत. या निवडणूकांसाठी सर्व पक्षात उमेदवारांची यादी तयार केली जात आहे. या निवडणूकांमध्ये भाजपाच्या एनडीए विरोधात कॉंग्रेसची इंडिया आघाडी अशी निवडणूक होणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार पुन्हा भाजपाच्या कळपात गेल्याने इंडिया आघाडीला जोरदार धक्का बसला आहे.
तेलंगणा | 31 जानेवारी 2024 : कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी या तेलंगणा राज्यातून लोकसभेची निवडणूक लढवू शकतात. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी ही घोषणा केली आहे. रेवंत रेड्डी यांनी सोनिया गांधी यांच्याविरोधात उमेदवार उभा न करण्याचे आवाहन सर्व पक्षांना केले आहे. तेलंगणाचे उपमुख्यमंत्री भट्टी विक्रमार्क यांनी याआधीच सोनिया गांधी यांना तेलंगणातून निवडणूक लढविण्याचे आवाहन केले होते. सोनिया गांधी पाच वेळा लोकसभा खासदार झाल्या आहेत. साल 2019 मध्ये सोनिया गांधी रायबरेलीतून खासदार म्हणून निवडणूक जिंकल्या होत्या.
तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष रेवंत रेड्डी यांनी मंगळवारी राज्य कॉंग्रेसने सर्व संमतीने एक प्रस्ताव पारित केला. यात अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी आणि तिचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना लोकसभेसाठी उमेदवार निवडण्याचे पूर्ण अधिकार देण्यात आले. लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी आलेल्या अर्जांवर 3 फेब्रुवारीपर्यंत विचार विनिमय करण्यात येणार आहे. या अर्जांवर विचार करण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे. मंत्री आणि निवडणूक प्रभारी यांना सर्व 17 लोकसभा जागांची जबाबदारी सोपवण्यात आवी आहे. येत्या 60 दिवसात निवडणूका होण्याची शक्यता असल्याचे रेवंत रेड्डी यांनी म्हटले आहे. कॉंग्रेस 2 फेब्रुवारीपासून सार्वजनिक बैठकांसोबतच लोकसभा निवडणूकांसाठीची आपली मोहीम सुरु करणार आहे.
डिसेंबर 2023 मध्येही केले होते आवाहन
गेल्यावर्षी डिसेंबर 2023 मध्ये देखील सोनिया गांधींना राज्यातील 17 लोकसभा सीटपैकी कुठुनही निवडणूक लढविण्याचे आवाहन तेलंगणा कॉंग्रेसच्या राजकीय बाबींच्या समितीने केली होती. तेलंगणात नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणूकांत कॉंग्रेसचा मोठा विजय होऊन कॉंग्रेस सत्तेत आली आहे. त्यामुळे सोनिया गांधी येथून कुठल्याही मतदार संघातून सहज निवडून येतील अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.
अमेठी आणि बेल्लारीतून आधी लढल्या
सोनिया गांधी उत्तर प्रदेशच्या अमेठी आणि कर्नाटकातील बेल्लारी येथून लोकसभा निवडणूक लढल्या आहेत. सोनिया गांधी यांच्या आधी इंदिरा गांधी यांनी 1980 मध्ये मेडक येथून ( तेव्हा आंध्रप्रदेश आता तेलंगणा ) लोकसभा निवडणूक लढली होती. प्रियंका गांधी रायबरेलीमधून निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले जात आहे.