West Bengal: सौरव गांगुलीची पत्नी डोना गांगुली राज्यसभेवर जाणार?; अमित शहांशी डिनर डिप्लोमसीनंतर चर्चांना उधाण
West Bengal: सौरव गांगुली यांचे तृणमूल काँग्रेस, भाजप आणि माकपाशी चांगले संबंध आहेत. सौरव गांगुली शनिवारी एका कार्यक्रमात सहभागी झाले होते.
कोलकाता: बीसीसीआयचे अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली (Saurav Ganguly) यांची पत्नी डोना गांगुली (Dona Ganguly) राज्यसभेवर जाण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्य म्हणून त्या राज्यसभेवर जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी शुक्रवारी रात्री सौरव गांगुली यांच्या घरी जाऊन जेवण घेतलं. त्यामुळे या चर्चांना अधिक उधाण आलं आहे. येत्या काळात राष्ट्रपती नियुक्त सदस्यांची राज्यसभेवर वर्णी लागणार आहे. यापूर्वी पश्चिम बंगालमधून रुपा गांगुली आणि स्वपन दासगुप्ता हे राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेवर गेले होते. आता या दोन्ही नेत्यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे भाजप बंगालमधून राज्यसभेवर पाठवण्यासाठी नव्या चेहऱ्याच्या शोधात आहेत. या पार्श्वभूमीवर शहा यांनी गांगुली यांच्या घरी जाऊन जेवण घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. सौरव गांगुली यांच्याकडून या चर्चांचं अजून खंडन करण्यात आलं नाही. त्यामुळे शहा यांची ही डिनर डिप्लोमसी आगामी काळात किती यशस्वी होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. डोना गांगुली या प्रसिद्ध नृत्यांगणा आहेत.
राष्ट्रपतींकडून 12 सदस्यांची राज्यसभेवर नियुक्ती होणार आहे. साहित्य, विज्ञान, कला आणि समाजसेवेशी निगडीत क्षेत्रातील लोकांची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नियुक्ती केली जाते. अमित शहा यांनी सौरव गांगुली यांच्या घरी रात्रीचं जेवण घेतलं होतं. त्यामुळे डोना गांगुली राज्यसभेवर जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र, भाजपने अजूनही त्यावर काही प्रतिक्रिया दिलेली नाही.
गांगुलींचे सर्वांशी चांगले संबंध
सौरव गांगुली यांचे तृणमूल काँग्रेस, भाजप आणि माकपाशी चांगले संबंध आहेत. सौरव गांगुली शनिवारी एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी आपले चांगले संबंध असल्याचं म्हटलं होतं. राज्याचे माजी नगरविकास मंत्री आणि ज्येष्ठ माकप नेते अशोक भट्टाचार्य यांच्याशीही त्यांचे निकटचे संबंध आहेत. त्याचप्रमाणे अमित शहा यांच्याशीही त्यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. सध्या तरी सौरव गांगुली हे सर्व राजकीय नेत्यांशी चांगले संबंध ठेवून आहेत. त्याचवेळी त्यांनी राजकारणात येणार नसल्याचंही अनेकदा स्पष्ट केलं आहे.
सौरव गांगुली राज्यसभेवर जाणार?
डोना गांगुली यांच्यासह सौरव गांगुली यांना सुद्धा राज्यसभेची उमेदवारी दिली जाण्याची चर्चा आहे. सौरव गांगुली राजकारणात आले तर चांगलं काम करतील. कारण ते जेही काम करतात ते चांगलंच करतात, असं शनिवारी डोना गांगुली यांनी म्हटलं होतं. त्यामुळे सौरव गांगुली राजकारणात येण्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. 2021च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी म्हणजे 2020मध्ये भाजपने दुर्गा पुजेचं आयोजन केलं होतं. यावेळी आयोजित कार्यक्रमात डोना गांगुली यांनी नृत्य केलं होतं. या कार्यक्रमाला अमित शहा उपस्थित होते. तसेच विधानसभा निवडणुकीपूर्वी सौरव गांगुली भाजपमधून निवडणूक लढणार असल्याची चर्चा होती. मात्र ही चर्चा खोटी असल्याचं उघड झालं होतं.