झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक? मोठा राजकीय भूकंप
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ईडीकडून त्यांची आज जवळपास सात तास चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना ईडीकडून अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे हेमंत सोरेन राजभवनात दाखल झाल्याची देखील माहिती समोर येत आहे.
रांची | 31 जानेवारी 2024 : देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ईडीने कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी हेमंत सोरेन यांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. हेमंत सोरेन यांची गेल्या सात तासांपासून ईडी चौकशी सुरु होती. त्यानंतर त्यांना आता अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मिळाल्या माहितीनुसार, हेमंत सोरेन हे राजभवनावर दाखल झाले आहेत. हेमंत सोरेन त्यांच्या ताफ्यासह राजभवन येथे दाखल झाले आहेत. ते मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यासाठी राजभवन येथे दाखल झाले आहेत. सोरेन सरकारमधील परिवहन मंत्री चंपई सोरेन यांच्याकडे आता सत्ता सोपवली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. चंपई सोरेन हे कदाचित झारखंडचे नवे मुख्यमंत्री होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदार महुआ माजी यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. हेमंत सोरेन हे ईडीच्या ताब्यात आहे. ईडीच्या ताब्यात असताना ते राज्यपालांच्या भेटीला आले आहेत. ते राज्यपालांकडे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द करत आहेत, असं महुआ माजी यांनी सांगितलं आहे.
राज्यपालांची फक्त पाच आमदारांना भेटण्यासाठी परवानगी
विशेष म्हणजे झारखंड मुक्ती मोर्चाचे आमदार राजभवनावर दाखल झाले आहेत. त्यापैकी काही आमदारांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिलीय. यावेळी त्यांनी चंपई सोरेने यांची विधीमंडळ नेता म्हणून निवड केल्याची माहिती दिली आहे. चंपई सोरेन हे झारखंडचे नवे मुख्यमंत्री असतील, असं आमदारांनी सांगितलं आहे. आमदारांची मोठी संख्या राजभवन परिसरात दाखल झाली आहे. सर्व आमदार राज्यपालांसमोर आपलं बहुमत सिद्ध करणार होते. पण राज्यपालांनी केवळ पाच आमदारांना भेटण्यासाठी परवानगी दिली आहे, असं आमदारांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितलं आहे.
देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने ही घटना अतिशय महत्त्वाची आहे. कारण देशात पुढच्या काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजणार आहे. हेमंत सोरेन यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तर दुसरीकडे झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून भाजपवर सडकून टीका केली जात आहे.