बापरे! गोव्याला जाणाऱ्या विमानात धूरच धूर; हैद्राबादमध्ये एमर्जन्सी लँडिंग
स्पाइस जेटमध्ये नुकतीच अशा प्रकारची घटना समोर आली आहे. स्पाइस जेट गेल्या काही काळापासून आर्थिक अडचणींनाही सामोरे जात आहे. रेग्युलेटरने स्पाइस जेटला 50 टक्के विमान उड्डाण करण्याची परवानगी दिली आहे.
हैद्राबाद: गोव्याला जाणाऱ्या स्पाइस जेटच्या फ्लाईटमध्ये अचानक धूर निघाला. त्यामुळे संपूर्ण विमानात धूरच धूर पसरला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे प्रवासीही घाबरून गेले. विमानाच्या कॉकपिट आणि केबिनमध्ये पूर्णपणे धूरच धूर झाला होता. त्यामुळे या विमानाचे तात्काळ हैद्राबादला लँडिंग करण्यात आलं. हे विमान सुरक्षितपणे लँडिंग करण्यात आलं. मात्र, यावेळी काही प्रवाशांना खरचटल्याचं सांगितलं जातं. दरम्यान, विमानात धूर झाला कसा? याची चौकशी केली जात आहे.
Q400 एयरक्राफ्ट VT-SQB या विमानात 86 प्रवासी होते. या एमर्जन्सी लँडिंगनंतर या रुटच्या नऊ फ्लाइट्सचे मार्ग डायव्हर्ट करण्यात आले. ही एमर्जन्सी लँडिंग काल रात्री 11 वाजेच्या सुमारास करण्यात आली होती.
या विमानातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने विमानातून धूर निघाल्यानंतरचा एक फोटो काढला. तसेच आपला अनुभवही शेअर केला. त्याशिवाय त्याने दोन व्हिडीओही शेअर केले आहेत. त्यात विमानाची एमर्जन्सी लँडिंग होताना दिसत आहे.
दरम्यान, अचानक निघालेल्या धुरामुळे विमानातील प्रवासी चांगलेच हादरुन गेले होते. काहींना श्वसनास त्रास झाल्याचंही सांगितलं जातं. जेव्हा विमान लँडिंग झालं. तेव्हा विमानाबाहेर पडण्यासाठी प्रवाशांची एकच धावपळ उडाली. या धावपळीवेळीच काही प्रवाशांना खरचटल्याचं सांगितलं जात आहे.
स्पाइस जेटमध्ये नुकतीच अशा प्रकारची घटना समोर आली आहे. स्पाइस जेट गेल्या काही काळापासून आर्थिक अडचणींनाही सामोरे जात आहे. रेग्युलेटरने स्पाइस जेटला 50 टक्के विमान उड्डाण करण्याची परवानगी दिली आहे. ही परवानगी 29 ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे.
रेग्युलेटर प्रकरणाची चौकशी केली जात आहे. विमानात धूर कसा निघाला? त्यामागचे कारण काय? याला कोण जबाबदार आहे? याची चौकशी केली जात असल्याचं डीजीसीएने स्पष्ट केलं आहे.