अपघात पाहण्यासाठी लोक आले अन् पुन्हा भयंकर दुसरा अपघात, ९ जणांचा मृत्यू
multiple cars crash accident : गुजरातमध्ये विचित्र अपघात झाला आहे. आधी थार गाडी अन् डंपरचा अपघात झाला. तो अपघात पाहण्यासाठी लोक थांबले होते. मग भरधाव येणाऱ्या गाडीने त्या लोकांना चिरडले.
अहमदाबाद | 21 जुलै 2023 : गुजरातमधील अहमदबाद येथील इस्कॉन पुलावर विचित्र अपघात झाला. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात अपघाताचा पंचनामा करण्यासाठी आलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. अपघातात दहा जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी रात्री हा अपघात झाला होता. या प्रकरणी कार चालकाला अटक करण्यात आली आहे.
कसा झाला अपघात
अहमदाबादमधील इस्कॉन पुलावर बुधवारी रात्री थार गाडी अन् डंपर यांचा अपघात झाला. हा अपघात पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी पुलावर झाली होती. पोलीस कर्मचारी पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी आले. यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या जगुआर गाडीने रस्त्यावर उभे असणाऱ्या लोकांना चिरडले. त्यात नऊ जणांचा मृत्यू झाला. त्यात दोन पोलीस कर्मचारी अन् एक होमगार्ड कर्मचाऱ्याचा समावेश आहे. या अपघातात दहा पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. कारने लोकांना धडक दिली तेव्हा ३० ते ४० फुट लांब फेकले गेले.
कार चालक जखमी
अपघातात जगुआर गाडीचा चालकही जखमी झाला आहे. त्याच्यासह इतर जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. दोन अपघात झाल्यानंतर घटनास्थळावर पोलिसांचा मोठा फौजफाटा पोहचला आहे. संपूर्ण पुलाची नाकेबंदी करण्यात आली. जगुआर गाडी १६० किलोमीटरच्या वेगाने धावत होती. त्यामुळे चालक गाडीचे नियंत्रण करु शकला नाही. जगुआर चालकाचे नाव ताथ्या पटेल (वय १९) आहे. पोलिसांनी चालक ताथ्या पटेल याचे वडील जिज्ञेश पटेल यांनाही अटक केली आहे. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांचा आहे समावेश
मृतांमध्ये कृणालभाई नटवरभाई कोडिया (20), रोनक राजेशभाई विहलपारा (19), अमीर अली काच्छी (21), अरमान अनिलभाई वधवानिया (19), अक्षर अनिलभाई पटेल (22), नीरवभाई आत्माराम रामानुज (22), हेड कॉन्स्टेबल जशवंतसिंह रणजीतसिंह चौहान (४५), हेड कॉन्स्टेबल धर्मेंद्रसिंह नरसंगभाई परमार (३५), होमगार्ड जवान नीलेश मोहन खाटिक (३८) यांचा समावेश आहे.