पाटणा: इंटर परीक्षेच्या दरम्यान बिहारच्या नालंदामध्ये एक विचित्र घटना घडली आहे. या परीक्षा केंद्रावर 50-60 नव्हे तर तब्बल 500 मुली परीक्षा देण्यासाठी आल्या होत्या. या 500 मुलींमध्ये एकच मुलगा परीक्षा देत होता. एवढ्या साऱ्या मुलींमध्ये आपण एकटेच असल्याचं पाहून या विद्यार्थ्याला चक्करच आली आणि तो जागेवर पडला. त्यामुळे त्याला घाईगडबडीत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शुद्ध आली तेव्हा आपण रुग्णालयात असल्याचं त्याला दिसून आलं. बिहारशरीफ येथील ही परीक्षा केंद्रावरील ही घटना आहे.
बिहारशरीफच्या अल्लामा इक्बाल कॉलेजातील विद्यार्थी मनिष शंकर याच्या बाबतीत हा प्रकार घडला. मनिष शंकर याला इंटर परीक्षेसाठी ब्रिलियन्ट हायस्कूल परीक्षा केंद्र म्हणून आलं होतं. त्यामुळे मनिष परीक्षेसाठी सकाळीच परीक्षा केंद्रावर गेला. पण तिथे गेल्यावर वर्गात सर्वत्र मुलीच मुली असल्याचं त्याने पाहिलं.
परीक्षा केंद्रावर एकूण 500 मुली होत्या. या 500 मुलीमध्ये आपण एकटेच असल्याचं लक्षात आल्याने त्याचे हातपाय थरथरू लागले. त्याला अस्वस्थ वाटायला लागलं अन् तो चक्कर येऊन पडला. त्यामुळे सर्वच घाबरले. शाळेच्या स्टाफने आधी त्याच्या तोंडावर पाणी मारून त्याला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला.
पण नंतर त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. यावेळी त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्याच्या प्रकृतीचीही माहिती देण्यात आली. त्यामुळे त्याचे नातेवाईकही तातडीने रुग्णालयात आले.
मनिष परीक्षा केंद्रावर मुलींमध्ये एकटाच होता. त्यामुळे तो घाबरून गेला. घामाघूम होऊन त्याला भोवळ आली आणि तो चक्कर येऊन पडला. तो बेशुद्ध झाला. त्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, असं मनिषची काकी पुष्प लता सिंह यांनी सांगितलं.
बिहारमध्ये बुधवारपासून इंटर मिडीएटची परीक्षा सुरू झाली आहे. नालंदा परीक्षा केंद्रावरील दरवाजा बंद असल्यामुळे मुलींनी जीव धोक्यात घालून परीक्षा केंद्रात प्रवेश केला. विशेष म्हणजे मुख्यमंत्री नितीश कुमार हे याच जिल्ह्यातून येतात.