लॉकडाऊनमुळे दुकानं बंद, दारुडे हैराण, डॉक्टरची चिठ्ठी दाखवून दारु मिळणार
लॉकडाऊनमुळे दारु मिळत नसल्याने (Kerala Government on Liquor alcohol) केरळमध्ये काही नागरिकांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
तिरुवनंतपुरम : लॉकडाऊनमुळे दारु मिळत नसल्याने (Kerala Government on Liquor alcohol) केरळमध्ये काही नागरिकांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटना एकामागे एक वारंवार घडत असल्याने अखेर केरळ सरकारने अशा नागरिकांसाठी महत्त्वाची भूमिका घेतली आहे. डॉक्टरांची चिठ्ठी दाखवल्यास दारु विकत घेता येईल, अशी घोषणा केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी केली आहे (Kerala Government on Liquor alcohol).
लॉकडाऊनमुळे केरळमध्ये सर्व दारुची दुकाने बंद करण्यात आले. मात्र, दारु मिळत नसल्याने अनेकांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दारुचे दुकान बंद झाले ही माहिती मिळाल्यावर कोल्लम शहराचा रहिवासी मुरलीधरन आचार्यला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. तर 34 वर्षीय नौषादने दारु नाही म्हणून शेविंग लोशन पिवून आत्महत्या केली. याशिवाय 7 जणांनी दारुचे दुकान बंद झाल्याने आत्महत्या केली.
केरळच्या त्रिसूर जिल्ह्यातील कोडंगलूरचा 32 वर्षीय सुनीलने दारु मिळत नाही म्हणून नदीत उडी मारुन आत्महत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी तपास केला असता सुनील दारु मिळत नसल्याने अस्वस्थ झाला होता. अखेर मध्यरात्री त्याने नदीत उडी मारुन आत्महत्या केली, अशी माहिती समोर आली. त्रिसूरच्या इरिनजलाकुडा येथून त्याचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला.
एका 46 वर्षीय व्यक्तीने दारु मिळत नसल्याने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कोट्टायम येथील सरकारी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. तर 38 वर्षाच्या एका मजूराने दारु मिळत नसल्याने झाडावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतरही केरळमध्ये 22 मार्च रोजी दारुची दुकाने सुरु होती. ही दुकाने अचानक बंद झाल्यामुळे राज्यात अनेक सामाजिक समस्या निर्माण होऊ शकतात, असा दावा मुख्यमंत्री विजयन यांनी केला होता. याशिवाय दारुच्या दुकानांपासून राज्याला मोठा महसूल उपलब्ध होतो. केरळच्या 14 जिल्ह्यांमध्ये एकूण 301 दारुचे दुकान आहेत. त्यापैकी 265 दुकान केरळ राज्याच्या पेय निगमच्या अखत्यारित येतात.
कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी भारतात लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये या दृष्टीकोनाने केंद्र सरकारने हे पाऊल उचललं आहे. हा लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत असणार आहे. लॉकडाऊन दरम्यान देशभरात फक्त जीवनाश्यक वस्तूंचे दुकान सुरु आहेत. मात्र, केरळमध्ये लॉकडाऊनमुळे दारु मिळत नसल्याने काही लोक आत्महत्या करणं धक्कादायक आहे.
संबंधित बातम्या :
संचारबंदीमुळे दारु नाही, इचलकरंजीत यंत्रमाग कामगाराची आत्महत्या