Sushasan Mahotsav 2024 : पंतप्रधान मोदी यांची सर्वात मोठी खासियत काय?; ज्योतिरादित्य सिंधिया काय म्हणाले?
सुशासनात जे तुम्ही मागितलं ते पूर्ण करणं माझा धर्म आहे. तसेच तुम्ही जे मागितलं नाही तेही पूर्ण करणं माझा धर्म आहे. ही भावना, चेतना आणि अंतरात्म्याची आवाज पहिल्यांदाच पंतप्रधानांच्या माध्यमातून देशातील जनतेच्या मनात ठसली आहे. जनतेला सुशासनाचा अनुभव घेता यावा, विकासकामांना गती मिळावी यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितलं.
नवी दिल्ली |10 फेब्रुवारी 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी एक महान लीडर आहेत. सर्वांचं ऐकून घेणं ही त्यांची सर्वात मोठी खासियत आहे. सर्वांचं ऐकून घेणारे फारच थोडे नेते आहेत. आज आमचा नेता वर्ल्ड लीडर झाला आहे. माझ्या पहिल्याच भेटीवेळी त्यांनी माझ्याशी एक तास चर्चा केली. माझा अनुभव, शिक्षण, संकल्पना यावर चर्चा केली. मला प्रचंड आश्चर्य वाटलं. एवढ्या महान व्यक्तीने आपला अमूल्य वेळ काढून मला वेळ दिलाच पण माझ्याशी सविस्तर चर्चाही केली. मी त्यांच्यावर ओझं झालोय, याची तसूभरही त्यांनी जाणीव होऊ दिली नाही. त्यांच्यात अद्भूत क्षमता आहे, असं केंद्रीय नागरी आणि उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने आयोजित केलेल्या सुशासन महोत्सवात ज्योतिरादित्य सिंधिया बोलत होते. मोदी सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यांनी निर्णय घेण्याची आणि ते लागू करण्याची प्रक्रिया महत्त्वाची आहे. कोरोना काळात फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या. एव्हिएशन सेक्टर पुनरागमन करणार होता. तेव्हा अनेक राज्यांना एव्हिएशन टर्बाईन फ्यूलवरील व्हॅट कमी करण्याचं आवाहन केलं. त्यानंतर राज्यांनीही आमच्यावर विश्वास दाखवला. हे सुशासन नाही तर काय आहे? असा सवाल ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केला.
सुशासन संकल्पना जुनीच
सुशासनचा विचार करायला गेलं तर प्राचीन काळात जावं लागेल. हजारो वर्ष मागे जावं लागेल. सुशासन ही काही नवी संकल्पना नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही संकल्पना पुन्हा मांडली. सुशासन हे आपल्या रक्तातच आहे. त्याचं पुनरुज्जीवन करण्यात आलं. वसुधैव कुटुंबकमची कल्पना हा सुशासनाचा एक भाग आहे. देशातील कोणताही भाग असेल, तिथल्या प्रत्येक व्यक्तीवर या संकल्पनेचा प्रभाव आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
हेच सुशासन आहे
आम्ही मंत्री असो की आमदार असो की खासदार असो. पण ते लोकांमुळे आहोत. लोकांनी त्यांचे प्रतिनिधी म्हणून आपल्याला पाठवलेलं आहे. याचा अर्थ एक एक मतदाता… मतदाता म्हणजेच मत देणारा दाता, म्हणजेच तुमचा देव. या देवाची पूजा तुम्हाला करायची आहे. त्याची सेवा करायची आहे. ही केवळ राजकीय जबाबदारी नाही. ही धार्मिक जबाबदारी आहे. अध्यात्मिक जबाबदारी आहे. लोकांचं जीवन सुसह्य करणं हेच सुशासन आहे, असंही त्यांनी सांगितलं.
इंग्रज टिकलेच नसते
यावेळी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी त्यांच्या कुटुंबाच्या योगदानाचंही स्मरण केलं. अहमद शाह अब्दालीने पानीपतच्या तिसऱ्या युद्धात आमच्या कुटुंबातील 16 लोकांची मुंडकी उडवली. कुटुंबातील एकच सदस्य वाचला. त्यांचाही या लढाईत पाय कापला गेला होता. त्यांनी एकट्यांनीच घरातील दागिने विकून मराठ्यांची फौज उभी केली. त्यानंतर पुन्हा दहा वर्षाच्या आत लालकिल्ल्यावर भगवा ध्वज फडकवला. महादजी शिंदे यांनी अटकपासून कटकपर्यंत आणि भरूचपासून अलाहाबादपर्यंत साम्राज्य स्थापन केलं. 1771 पासून 1803 पर्यंत पहिल्या हिंदू राज्यकर्त्यांनी दिल्लीतून संपूर्ण देशावर राज्य केलं. ते जीवंत असते तर इंग्रज या देशात टिकलेच नसते, असंही ते म्हणाले.