सुषमा स्वराज यांची कन्या बांसुरी स्वराज यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर
BJP Candidate List : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत एकूण १९५ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. ज्यामध्ये नवी दिल्लीतून दिवंगत माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या मुलीला देखील उमेदवारी देण्यात आली आहे.
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपली पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत 195 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीतील नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. पाच पैकी चार खासदारांची तिकिटे कापण्यात आली आहेत. मनोज तिवारी ईशान्य दिल्लीतून पुन्हा एकदा निवडणूक लढवणार आहेत. तर दुसरीकडे माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी स्वराज यांना देखील दिल्लीतून उमेदवारी देण्यात आली आहे.
चांदनी चौक मतदारसंघातून प्रवीण खंडेलवाल, ईशान्य दिल्लीतून मनोज तिवारी, नवी दिल्ली मतदारसंघातून बान्सुरी स्वराज, पश्चिम दिल्लीतून कमलजीत सेहरावत आणि दक्षिण दिल्लीतून रामवीर सिंग बिधुरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दिल्लीत लोकसभेच्या सात जागा आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपने सर्व जागांवर बाजी मारली होती. याआधी नवी दिल्लीतून मीनाक्षी लेखी, चांदनी चौकातून डॉ. हर्षवर्धन, दक्षिण दिल्लीतून रमेश बिधुरी आणि पश्चिम दिल्लीतून प्रवेश वर्मा हे खासदार होते. पण त्यांना आता संधी मिळालेली नाही. त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
भाजपकडून आणखी दोन जागांची घोषणा होणे बाकी आहे. त्यामध्ये गौतम गंभीर यांच्या जागेचा देखील समावेश आहे. गौतम गंभीरने राजकारणातून संन्यास घेतल्याने आता या जागेवर नव्या चेहऱ्याला संधी मिळू शकते.
कोण आहेच बांसुरी स्वराज?
बांसुरी स्वराज या वकील आहे. त्या सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करतात. इंग्रजी साहित्यात त्यांनी बीए ऑनर्ससह पदवी घेतल्यानंतर लंडनमधील बीपीपी लॉ स्कूलमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सेंट कॅथरीन कॉलेजमधून बांसुरी यांनी मास्टर्स केले आहे.
सुषमा स्वराज यांची मुलगी बांसुरी स्वराज यांना याआधी भाजपकडून कायदेशीर सेलचे सहसंयोजक म्हणून जबाबदारी दिली होती. सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी देखील राजकारणात सक्रिय झाली होती. आता त्यांना थेट उमेदवारी मिळाल्याने त्या राजकारणात आणखी सक्रिय होणार आहेत.