विमानाच्या कॉकपीटमध्ये गुजिया महागात पडले, स्पाईस जेटच्या दोन पायलटवर कारवाई
विमानाच्या कॉकपिटमध्येच दोन वैमानिकांनी होळीची पार्टी केली. कॉकपिटमध्ये गुजिया खाताना आणि कॉफी पितानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
नवी दिल्ली : स्पाईसजेटचे दोन पायलट कॉकपिटमध्ये अनोख्या पद्धतीने होळी साजरी करत होते. कन्सोलवर ग्लासमध्ये कॉफी ठेवली आणि त्यासोबत गुजिया खात होते. ही पार्टी त्यांना चांगलीच महागात पडली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आठवडाभरानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. दोन्ही वैमानिकांना ड्युटीवरून निलंबित करण्यात आले आहे. चौकशी पूर्ण झाल्यावर योग्य शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असे स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले. स्पाईसजेटच्या कॉकपिटच्या आत खाण्यापिण्याबाबत कठोर नियम आहेत, ज्याचे पालन सर्व फ्लाइट क्रू सदस्य करतात.
दोन्ही पायलटवर निलंबनाची कारवाई
ही बाब उघडकीस आल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) मंगळवारी विमान कंपनीला क्रू मेंबर्सची त्वरित ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. सूचना मिळाल्यानंतर लगेचच विमान कंपनीने दोन्ही वैमानिकांना फ्लाइंग ड्युटीतून काढून टाकले. तसेच वरिष्ठ वैमानिकांनी अशा प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली आहे.
एका वरिष्ठ पायलटने सांगितले की, कॉफीचा कप विमानाच्या इंधन लीव्हरवर सेंटर कन्सोलच्या मध्यभागी ठेवण्यात आला आहे. अगदी खाली इंजिन आणि फायर कंट्रोल स्विच आहे. जर कॉफी सांडली असती आणि फायर पॅनेलवर आदळली असती, तर त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन फायर अलार्म सुरू होऊ शकतो आणि क्रूला आपत्कालीन स्थिती घोषित करणे आवश्यक होते. सेंट्रल पॅडस्टल दोन पायलटच्या मध्ये असते आणि मुख्य संगणक इंटरफेस, उड्डाण नियंत्रणे, इंजिन नियंत्रणे आणि सर्व संप्रेषण प्रणाली आहेत.