‘कोणाची बायको सुंदर आहे बघतात, आणि…’, तृणमुलच्या कार्यालयात लैंगिक शोषण, नुसरत जहाँ गप्प का?
Sandeshkhali women physical exploitation | देशाच्या राजकारणाला हादरवून सोडणारी एक बातमी समोर आलीय. पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागात तृणमुल काँग्रेसच्या कार्यालयात महिलांच लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार समोर आलाय. अत्यंत पद्धतशीरपणे हे सर्व सुरु होतं. तृणमुलचे कार्यकर्ते थेट घरात घुसायचे.
कोलकाता : तृणमुल काँग्रेसवर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आलाय. तृणमुलच्या नेत्यावर पद्धतशीरपणे महिलांच लैंगिक शोषण करण्याच आरोप आहे. पश्चिम बंगालच्या संदेशखालीमधील ही गंभीर घटना आहे. पश्चिम बंगालच्या राजकारणात हा मुद्दा तापत चालला आहे. तृणमुलच्या कार्यालयात लैंगिक शोषण झाल्याचे आरोप तृणमुलच्या नेतृत्वाने नाकारलेले नाहीत. संदेशखाली भाग तृणमूल खासदार नुसरत जहाँ यांच्या लोकसभा मतदारसंघात येतो. नुसरत जहाँ एरवी सोशल मीडियावर सक्रीय असतात. पण या मुद्यावर गप्प का? असा सवाल भाजपाने विचारला आहे.
भाजपा संदेशखालीमधील महिलांच्या पाठिशी उभा राहिला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाने या विरोधात निदर्शने केली. कोलकाता हाय कोर्टाने याची दखल घेऊन 20 फेब्रुवारीपर्यंत पश्चिम बंगाल सरकारला अहवाल सादर करायला सांगितला आहे. संदेशखालीमधील शेख शहाजहाँन या नेत्यावर लैंगिक शोषणाचे आरोप आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यावर मौन बाळगून आहेत. “मी राज्याच्या महिला आयोगाला तिथे पाठवलं होतं. त्यांनी आपला रिपोर्ट सादर केला. तिथे हिंसाचार करणाऱ्यांना अटक करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे” असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. इंडिया टुडेने हे वृत्त दिलय.
‘आवडणाऱ्या महिलेला उचलून पक्ष कार्यालयात घेऊन जातात’
तृणमुल काँग्रेसचा ताकदवर नेता शहाजहाँन शेख आणि त्याच्या सहकाऱ्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर संदेशखालीमध्ये निदर्शन सुरु झालीयत. “तृणमुलचे सदस्य घरात येऊन बघतात, कोणाची बायको सुंदर आहे? कोणाची मुलगी तरुण आहे? त्यानंतर ते त्या महिलेला उचलून पक्ष कार्यालयात घेऊन जातात. त्यांचं समाधान होत नाही, तो पर्यंत महिलेला तिथे ठेऊन तिच्यावर अत्याचार करतात” असा आरोप एका महिलेने केला. तो व्हिडिओ आता व्हायरल झालाय. पश्चिम बंगालमध्ये भाजपाने या घटनेविरोधात विरोध प्रदर्शन सुरु केलय. महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी ममता बॅनर्जी सरकारला चांगलच सुनावलं.
‘हिंदुंच्या नरसंहारासाठी ओळखल्या जातात’
“ममता बॅनर्जी या हिंदुंच्या नरसंहारासाठी ओळखल्या जातात. आता त्या त्यांच्या कार्यकर्त्यांना हिंदू विवाहित महिलांना उचलून पक्ष कार्यालयात आणून बलात्कार करण्यासाठी परवानगी देत आहेत. शेख शहाजहाँन कुठे आहे? या प्रश्नाच उत्तर ममता बॅनर्जी यांनी द्याव” असा सवाल स्मृती इराणी यांनी विचारला.