कुणी दागिने दिले, तर कुणी कोठा सोडला, संजय दत्तच्या आज्जीने तर… स्वातंत्र्यातील वेश्यांचं योगदान माहीत आहे काय?
स्वातंत्र्य चळवळीत वेश्यांनी खूप मोठं योगदान दिलं. पण त्यांचा इतिहास म्हणावा तसा लिहिला गेला नाही. त्यांना पाहिजे तशी ओळख मिळाली नाही. प्रसिद्धी दिली गेली नाही. त्यांच्याबाबतचं एखादं टपाल तिकीट किंवा स्मारकही काढलं गेलं नाही.
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अनेक स्वातंत्र्य सैनिक, क्रांतीकारक, महापुरुषांचं स्मरण केलं जातं. स्वातंत्र्यातील त्यांच्या योगदानांवर चर्चा केली जाते. स्वातंत्र्याच्या आंदोलनात तरुणांनी आणि विद्यार्थ्यांनी कसा भाग घेतला, महिला कशा पदर खोवून रस्त्यावर उतरल्या याचा इतिहास सांगितला जातो. पण हा इतिहास सांगताना अनेकजण एक महत्त्वाचा इतिहास विसरून जातात. तो इतिहास म्हणजे वेश्यांचा. देशातील अनेक वेश्याही स्वातंत्र्य चळवळीने भारावलेल्या होत्या. त्यांनीही आपल्या परीने स्वातंत्र्य चळवळीत मोठं योगदान दिलं आहे. या सर्व छोट्यामोठ्या हातांनी स्वातंत्र्य आंदोलनात योगदान दिल्यानेच देशाला स्वातंत्र्य मिळू शकलं. या सर्वांच्या बलिदानांमुळेच आज आपण मुक्ततेचा श्वास घेत आहे. स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या देहविक्रय करणाऱ्या या कोण महिला होत्या? त्याचाच घेतलेला हा आढावा.
नर्गिस यांच्या आईने कोठा सोडला
स्वातंत्र्य चळवळीच्या काळात उत्तर प्रदेशातील वाराणासीतील (बनारस) चौक परिसरातील प्रमुख बाजार दालमंडीच्या गल्ल्यांमधील कोठ्यांवर संगिताची मैफल सजायची. राजेश्वरबाई, जद्दन बाईपासून ते रसूलन बाईपर्यंत अनेक वेश्यांचा हा कोठा होता. या कोठ्यांवर सजणाऱ्या मैफिलीतच देशाला इंग्रजांच्या तावडीतून सोडवण्याची रणनीती ठरवली जायची. प्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस यांची आई आणि अभिनेता संजय दत्तची आज्जी जद्दन बाई यांनी कोठ्यावर सातत्याने इंग्रजांचे छापे पडत असल्याने वैतागून दालमंडीची गल्ली सोडली होती. ठुमरी गायिका राजेश्वरी बाई तो प्रत्येक मैफिलीत ‘भारत कभी न बन सकेला गुलाम…’, गाना नहीं भूलती रहीं। ही अंतिम बंदीश सादर करायची.
जद्दन बाई यांची आई दलीपबाई या वेश्या होत्या असं सांगितलं जातं. जद्दनबाई प्रसिद्ध नृत्यांगणा होत्या. त्या देशातील प्रसिद्ध ठुमरी गायिका होत्या. त्या देशातील पहिल्या संगीतकारही होत्या. त्या जेव्हा नृत्य करायच्या तेव्हा राजे रजवाडे मंत्रमुग्ध होऊन जायचे. त्या नृत्याच्या क्लासेसही घ्यायच्या. त्यांची एक मोठी हवेली होती. याच हवेलीत क्लास चालायचे. या ठिकाणी मुजराही व्हायचा असं सांगितलं जातं. जद्दनबाईंबद्दल अनेक वदंता आहेत. काहींच्या मते त्यांची तीन लग्न झालेली होती. तर काहींच्या मते त्यांचं एकच लग्न झालेलं होतं. जद्दनबाईंनी फिल्मी दुनियेतही पाऊल टाकलं होतं. त्यांनी प्रोडक्शन हाऊस स्थापन केलं होतं. त्यांनी तलाश ए हक हा सिनेमा काढला होता.
तोपर्यंत दागिने घातले नाही
‘फुलगेंदवा न मारो, मैका लगत जोबनवा में ….’, सारखी गीतांनी प्रसिद्ध झालेली रसूलन बाईने तर जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हाच दागिने अंगावर घातले. देश स्वातंत्र्य होत नाही, तोपर्यंत अंगावर एकही दागिना घालणार नाही, असा पणच रसूलन बाईने केला होता. तर दुलारी बाई या वेश्येने आवाहन केल्यानंतर तिच्या खास नन्हकूने इंग्रजांचे मुंडके धडावेगळे केले होते. कजरी गायिका सुंदरीचे प्रेमी नागर यांना ब्रिटनच्या सैन्याविरोधात मोर्चा काढल्याने काळ्यापाण्याची शिक्षा झाली होती. तर स्वर जीवनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिद्घेश्वरी देवीच्या मैफिलीतही देशभक्तिपर गीतांची रेलचेल असायची.
बनारसी पानावर बंदी
इंग्रज या आंदोलनाला एवढे घाबरले होते की त्यांनी बनारसी पानावरही बहिष्कार टाकला होता. स्वातंत्र्य चळवळीत बनारसी पानाचीही मोठी भूमिका असू शकते, असं इंग्रजांना वाटलं होतं. त्यामुळेच त्यांनी या पानावर बंदी घातली होती. दालमंडीत पानाची दुकान चालवणाऱ्या एका व्यक्तीने हा किस्सा सांगितला होता. इंग्रजांनी पानावर बंदी घातली असली तरी चोरून चोरून प्रत्येकाच्या घरात पान पोहोचवलं जायचं. बनारसी पानाची खासियत म्हणजे ते तोंडात ठेवताच विरघळून जातं. या पानाला लावण्यात येणारा कात, चूना आणि सुपारी पानवाले घरीच तयार करायचे.
गुप्तहेर, खबरी आणि…
एक महिला पुरुषांच्या वेशात, छातीवर मेडल लावून आणि हातात बंदूक घेऊन घोड्यावर स्वार होत इंग्रजांच्या विरोधात लढली. अजीजन बआई असं या महिलेचं नाव. 1857 च्या क्रांतीत तिने मोठं योगदान दिलं. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारी ही वेश्या होती. कधी पडद्यात राहून तर कधी समोर येऊन तिने इंग्रजांशी मुकाबला केला. अजीजन बाई ही एक खबरी होती, गुप्तहेर होती आणि योद्धाही होती असं सांगितलं जातं. तिचा जन्म लखनऊमध्ये झाला. तिची आई सुद्धा वेश्या होती. पण देशप्रेमापोटी ती लखनऊवरून कानपूरला आली. अजीजन बाईच्या घरी भारतीय सैन्याच्या बैठका होत असत. अजीजन बाई ही ब्रिटिश इंडियन आर्मीच्या सैनिकांच्या अत्यंत जवळ होती. तिच्या कोठ्यावर स्वातंत्र्य चळवळीची रणनीती बनवली जायची. 1 जून 1857च्या क्रांतीकारकांनी तिच्या घरी कानपूरमध्ये एक बैठक केली होती.
या बैठकीला नानासाहेब तात्या टोपे यांच्यासह सुभेदार टीका सिंग, शमसुद्दीन खां आणि अजीमुल्ला खान उपस्थित होते. अजीजन बाई सुद्धा या बैठकीला उपस्थित होती. त्याचवेळी या सर्वांनी हातात गंगाजल घेऊन इंग्रजांना भारतातून हुसकावून लावण्याची शपथ घेतली होती. अजीजन बाई ज्या क्रांतीकारकांच्या गटासोबत वावरत होत्या, तो गट हत्यारबंद सैनिकांचं मनोबल वाढवणं, त्यांच्या जखमांवर मलपट्टी लावण्याचं काम करायचे. शस्त्रांचा पुरवठा करायचे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीही अजीजन बाईच्या योगदानाचा उल्लेख केलेला आहे. या वेश्यांनी स्वातंत्र्य चळवळीत गुप्तहेर आणि खबरी म्हणूनही काम केलं. ब्रिटिश सैन्याशी जवळीक साधून त्यांची माहिती क्रांतीकारकांना पुरवण्याचं काम केलं. क्रांतीकारकांना आश्रय देण्याचं, त्यांना लपवण्याचं, शस्त्रसाठा पुरवण्याचं कामही त्यांनी केलं.
तबला, सारंगी पाण्यात सोडले
या वेश्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत आर्थिक योगदानही दिलं होतं. याच काळातील एक गोष्ट सांगितली जाते. त्यात किती तथ्य आहे माहीत नाही. पण ही गोष्ट नेहमी चर्चेत असते. एकदा म्हणे, काही वेश्या महात्मा गांधींना भेटल्या होत्या. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्याची आणि चळवळीला आर्थिक योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण महात्मा गांधी यांनी या महिलांकडून पैसे घेण्यास नकार दिला. यावेळी त्यांनी नैतिकतेचा हवाला दिला. चारित्र्य विकून मिळालेला पैसा काय कामाचा? असा सवाल गांधीजींनी केला. त्यामुळे अनेक महिला दु:खी झाल्या. तर काहींनी ही गोष्ट मनावर घेतली. अनेकींनी तर नाचगाणं कायमचं बंद केलं. अनेक वेश्यांनी तानपुरा, तबला, सारंगी आदी संगीत साहित्य बनारसच्या गंगेत सोडून दिलं आणि चरखा चालवण्यास सुरुवात केली.
कोठ्यावर देशभक्तीची गीते
वेश्यांनी घेतलेला हा निर्णय अत्यंत मोठा होता. कारण त्यांनी आपली आर्थिक रसद स्वत:च तोडून टाकली होती. काही वेश्यांनी तर त्यांच्या कोठ्यावर केवळ देशभक्तीची गाणीच गायचा निर्णय घेतला. स्वर जीवनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिद्धेश्वरी देवी सुद्धा त्यांच्या मैफलीत देशभक्तीची गीते गायच्या. अशीच एक वेश्या होती. तिचं नाव गौहर जान. तिने स्वातंत्र्याच्या चळवळीत योगदान म्हणून स्वराज्य कोषात मोठी आर्थिक मदत केली होती.
दागिने टाकले, हातकड्या घातल्या
गांधीजींच्या आंदोलनात हुस्नाबाई, विद्याधरी बाई यांनी सक्रिय सहभाग घेतला. मात्र, स्वातंत्र्य चळवळीशी निगडीत पुस्तकात याचा उल्लेख आढळत नाही. 1920 ते 1922 पर्यंत असहकार चळवळीच्या काळात वाराणासीतील एका गटाने स्वातंत्र्य चळवळ पुढे नेण्यासाठी वेश्यांची सभाही (संघटना) निर्माण केली होती. या सभेचं नेतृत्व हुस्ना बाई यांच्याकडे होतं. या सभेच्या सदस्यांना एकत्रितपणे विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यापासून ते दागिण्याच्या जागी लोखंडाची हातकडी वापरण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. स्वातंत्र्याच्या पहिल्या आणि शेवटच्या आंदोलनातही वेश्यांनी मोठं योगदान दिलं होतं.
सामाजिक भेदभाव
स्वातंत्र्य चळवळीत वेश्यांनी खूप मोठं योगदान दिलं. पण त्यांचा इतिहास म्हणावा तसा लिहिला गेला नाही. त्यांना पाहिजे तशी ओळख मिळाली नाही. प्रसिद्धी दिली गेली नाही. त्यांच्याबाबतचं एखादं टपाल तिकीट किंवा स्मारकही काढलं गेलं नाही. समाजात वेश्यांबद्दलची भावना चांगली नसल्यानेही त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याचं सांगितलं जात आहे.
राष्ट्रीय आंदोलनातील सार्वजनिक बैठकांमधील या महिलांची उपस्थिती इतर महिलांना खटकायची. काँग्रेसच्या एका कार्यक्रमात गौहर जान यांचं गाणं इतर महिलांना आवडलं नाही. त्यामुळे त्यांना कार्यक्रमातून हाकलून लावण्यता आलं होतं. 1924ला बेळगावमध्ये काँग्रेसचं अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनाला किराणा घराण्याच्या गायिका गंगूबाई हंगलही गेल्या होत्या. महात्मा गांधीही या अधिवेशनात उपस्थित होते. त्यावेळी गंगूबाई हंगल यांना वेगळ्या पंगतीत बसायला सांगण्यात आलं होतं.